हृदयद्रावक! रुग्णवाहिका मिळाली नाही; हतबल बापाने बाईकच्या डिक्कीतून नेला लेकाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 02:50 PM2022-10-20T14:50:00+5:302022-10-20T14:51:06+5:30

मृत नवजात बाळाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे पित्याने नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीत ठेवून मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं.

father reached singrauli collector office in madhya pradesh with dead newborn in bag not get ambulance | हृदयद्रावक! रुग्णवाहिका मिळाली नाही; हतबल बापाने बाईकच्या डिक्कीतून नेला लेकाचा मृतदेह

फोटो - NBT

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत नवजात बाळाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे पित्याने नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीत ठेवून मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. सिंगरौलीतील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश भारती त्यांची गर्भवती पत्नी मीना यांना घेऊन 17 ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातील डॉ. सरिता शाह यांनी प्रसुती करण्याऐवजी मीना यांना खासगी क्लिनिकमध्ये पाठवलं. वर त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले. अर्भकाचा गर्भाशयातच मृत्यू झाल्याचं क्लिनिकमधील डॉक्टरांना समजलं. त्यानंतर त्यांनी महिलेला पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवलं. तिथे तिची प्रसुती करण्यात आली, तेव्हा बाळ मृतावस्थेत होतं.

बाळाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका मागितली. बाळाला गावी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र रुग्णालयाने रुग्णवाहिका दिली नाही असा आरोप दिनेश भारती यांनी केला आहे. यानंतर दिनेश यांनी बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीत ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. दिनेश यांनी त्यांची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम यांना चौकशीचे आदेश दिले. सिंगरौलीचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बाळाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याची तक्रार मिळाली आहे. या प्रकरणी सिंगरौलीच्या एसडीएमना तपासाचे आदेश दिले आहेत. तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: father reached singrauli collector office in madhya pradesh with dead newborn in bag not get ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.