मुलाला ठोकरणाऱ्या कारचा ८ वर्षे शोध घेत होते वडील, पोलिसांकडून फाईल बंद, एक पुरावा सापडला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:44 PM2023-11-09T18:44:34+5:302023-11-09T18:44:45+5:30
Crime News: ५ जून २०१५ रोजी गुरुग्राममधील सेक्टर ५७ मध्ये रेल्वे विहारजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. अमित चौधरी नावाचा हा विद्यार्थी काकांसोबत घरी जात होता. त्याचवेळी एका अज्ञात कारने त्याला धडक दिली होती.
५ जून २०१५ रोजी गुरुग्राममधील सेक्टर ५७ मध्ये रेल्वे विहारजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. अमित चौधरी नावाचा हा विद्यार्थी काकांसोबत घरी जात होता. त्याचवेळी एका अज्ञात कारने त्याला धडक दिली होती. दरम्यान, या मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी तब्बल आठ वर्षे शोध घेत मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला शोधून काढले आहे.
कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या अमित याचा उपचारांसाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. तर आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याच दिवशी सेक्टर ५६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चालकाची ओळख पटली नव्हती. अखेर पोलिसांनी ही फाईल बंद केली. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी अमितच्या वडिलांनी अनेकदा पोलीस ठाण्यामध्ये हेलपाटे मारले. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. अखेरीस आपल्या मुलाला स्वत:च न्याय मिळवून द्यायचा निश्चय जितेंद्र चौधरी यांनी केला.
घटनास्थळवर त्यांना एक तुटलेला साईड मिरर आणि अॅमेटलचा भाग मिळाला. त्यामुळे या संपूर्ण खटल्याची दिशाच बदलली. एका मेकॅनिकाने त्यांना सांगितले की, साइड मिरर सुझुकी स्विफ्ट व्हीडीआय कारचा आहे. त्यानंतर जितेंद्र चौधरी यांनी मदतीसाठी मारुती कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर कारच्या काचेवर असलेल्या प्रिंटेड क्रमांकावरून मालकाच्या नोंदणी क्रमांकाचा शोध घेण्यात त्यांना यश मिळालं.
त्यांनी ही माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली. मात्र तपास काही पुढे सरला नाही. पुढे त्यांनी कोर्टात धाव घेतली. तिथे बरीच वर्षे सुनावणी चालली. दरम्यान, चौधरी यांनी यावर्षी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली आणि त्यांच्या मुलाला कारखाली चिरडून फरार झालेल्या कारचालकाविरोधात कारवाईची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना पुन्हा एकदा तपास करण्याचे आदेश दिले. मात्र तरीही तपास पुढे सरकला नाही. त्यामुळे कोर्टाने पोलिसांची खरडपट्टी काढली आणि संबंधिक पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले.
शेवटी पोलिसांनी वाहन मालक ज्ञानचंद विरोधात आरोपपत्र दाखल केलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करू. चौधरी म्हणाले की, या सुमार तपास आणि त्रुटीनंतरही मला माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीला अटक होईल आणि लवकरच त्याला कोर्टासमोर आणलं जाईल, अशी अपेक्षा आहे.