वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:44 PM2024-05-29T12:44:31+5:302024-05-29T12:47:41+5:30
आयएएस निरीश राजपूत यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अडचणींशी लढा दिला, संघर्ष केला आणि घवघवीत यश मिळवलं आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. परिस्थिती कशीही असली तर त्यात हार मानता कामा नये हेच दाखवून दिलं आहे. आयएएस निरीश राजपूत यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व अडचणींशी लढा दिला, संघर्ष केला आणि घवघवीत यश मिळवलं आहे.
मध्य प्रदेशमध्ये राहत असलेल्या निरीश यांचा जन्म एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे वडील शिंपी म्हणून काम करायचे. आर्थिक अडचणी असतानाही निरीश यांनी मोठं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले.
निरीश यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेतलं कारण त्याचं कुटुंब खासगी शाळेची फी भरण्यास असमर्थ होतं. त्यानंतर, निरीश ग्वाल्हेरला गेले आणि त्यांनी घर चालवण्यासाठी नोकरी शोधली. याच दरम्यान, त्यांनी बीएससी आणि एमएससी डिग्री घेतली.
UPSC चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी सुरू ठेवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या मित्राकडून अभ्यासाचं साहित्य घेतलं. निरीश यांनी दिल्लीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागला, त्यावर मात करण्यासाठी त्यांनी अभ्यासासोबतच वर्तमानपत्रं विकण्यासारखे अनेक पार्ट टाईम जॉब केले.
निरीश राजपूत यांना पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये UPSC पास करण्यात यश मिळालं नाही. शेवटी चौथ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी ऑल इंडिया रँक ३७० मिळवला आहे. ते आयएएस अधिकारी झाले आणि लाखो तरुणांसाठी आता ते प्रेरणास्थान आहेत.