ह्दयद्रावक घटना! कारच्या सीटवर मुलीचा मृतदेह बांधून हतबल बापाला करावा लागला ८० किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:01 AM2021-05-26T08:01:57+5:302021-05-26T08:10:57+5:30
अखेर मजबुरीनं वडिलांनी गाडीच्या सीटवर मुलीचा मृतदेह बांधला आणि त्याच अवस्थेत ८० किमी दूर असलेल्या झालावाड येथील त्यांच्या घरी पोहचले.
जयपूर – राजस्थानच्या कोटा येथे एक हतबल बापानं मुलीचं आयुष्य वाचवण्यासाठी तिला न्यू मेडिकल हॉस्पिटल येथे आणलं परंतु ती वाचू शकली नाही. त्यानंतर हद्द म्हणजे मरण पावलेल्या मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. हॉस्पिटलबाहेर उभ्या असणाऱ्या एका खासगी रुग्णवाहिकेने इतक्या पैशांची मागणी केली जी देणं त्या बापाला शक्य झालं नाही.
अखेर मजबुरीनं वडिलांनी गाडीच्या सीटवर मुलीचा मृतदेह बांधला आणि त्याच अवस्थेत ८० किमी दूर असलेल्या झालावाड येथील त्यांच्या घरी पोहचले. आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह कारच्या सीटवर ठेऊन त्या हतबल बापानं ८० किमी रस्ता कसा पार केला असावा याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. ही ह्दयद्रावक घटना सोमवारी घडली आहे. काही दिवसांपूर्वी ३४ वर्षीय सीमाच्या उपचारासाठी तिला कुटुंबाने झालावाड येथून कोटा येथे आणले होते.
कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये सीमावर उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांना सीमाचा मृतदेह झालावाड येथे त्यांच्या निवासस्थानी घेऊन जायचा होता. पण कुटुंबाला शवगृहापासून सीमाचा मृतदेह हॉस्पिटलबाहेर असणाऱ्या गाडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी वॉर्डबॉय उपलब्ध झाला नाही. कुटुंबाच्या लोकांनी स्वत:च्या मृतदेह हॉस्पिटलबाहेर आणला. सीमाच्या घरच्यांनी हॉस्पिटलबाहेर असणाऱ्या रुग्णवाहिकांना विचारणा केली असता त्यांनी २० हजार ते ३५ हजार रुपयांची मागणी केली. इतके पैसे देण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. त्यानंतर सीमाच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये पुढच्या सीटला बांधला आणि झालावाड येथे घरापर्यंत आणला. मजबूरी, दु:ख आणि अश्रूच नाही तर प्रत्येकाचं काळीज पिळवटणारी ही धक्कादायक घटना आहे. पीडित कुटुंबाला मृतदेह कारमधून त्यांच्या घरी न्यावा लागला.
मृतदेह अशाप्रकारे घेऊन जाणे हे कोविड १९ च्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. परंतु काय करणार? हॉस्पिटलकडे मृतदेह घरापर्यंत पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाही. खासगी रुग्णवाहिका रुग्णांच्या नातेवाईकांना लुटायचे धंदे करत आहेत. अडचणीत असलेल्या लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. इतक्या पैशांची मागणी केली जाते की ती पूर्ण करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांकडे पैसे नसतात. अशावेळी जर एखादी बातमी समोर आली तर प्रशासन खडबडून जागे होते.
१०० मृतदेहांची कोरोना चाचणी पुन्हा घेण्यात आली. अस्थी आणि राख किती सुरक्षित? #CoronaVirusUpdateshttps://t.co/00fUWqpQEb
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
कोटामध्ये घडलेल्या या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असून खासगी रुग्णवाहिकांवर जरब बसवला जाईल. तक्रारकर्ते स्पष्टपणे कोणत्या रुग्णवाहिकेने किती पैसे मागितले. त्या माणसाचं नाव आणि गाडीचा नंबर हे सांगत नाहीत. त्यामुळे दोषींना पकडणं कठीण होत आहे. आमचा तपास सुरू आहे. सध्या या प्रकरणावरून दोघांचे निलंबन केले आहे आणि अज्ञात रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ रुग्णवाहिका सील केल्या आहेत.