प्रेरणादायी! भावाशी लग्न लावून देत होते वडील, 'ती' घरातून पळाली; एअरफोर्सचं स्वप्न पाहिलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:16 PM2023-12-13T14:16:14+5:302023-12-13T14:18:34+5:30
हमना जफर जेव्हा 19 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं तिच्या चुलत भावाशी लग्न ठरवलं. साखरपुड्याची तयारीही झाली होती.
मुलांची इच्छा काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय अनेक वेळा त्यांच्यावर पालक आपला निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात. असंच काहीसं एका तरुणीसोबत घडलं. हमना जफर जेव्हा 19 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं तिच्या चुलत भावाशी लग्न ठरवलं. साखरपुड्याची तयारीही झाली होती. पण हमना ते आवडलं नाही. तिला स्वतःच्या मर्जीने जगायचं होतं. शेवटी एक दिवस ती घरातून पळून गेली. संघर्ष केला आणि आज ती अमेरिकन एअरफोर्सची एक योद्धा आहे. हमनाची यशोगाथा सर्वांसाठी आशेचा किरण आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हमना जफरचे आई-वडील अमेरिकेतील मेरीलँडमध्ये राहत होते, परंतु ते कधीही अमेरिकेचं कल्चर स्वीकारू शकले नाहीत. हमनाला स्वतःच्या आवडीचं आयुष्य जगायचं होतं. स्वप्नासाठी तिला मोठी किंमत चुकवावी लागली. एके दिवशी तिचे आई-वडील तिला म्हणाले की, आपल्याला पाकिस्तानला जायचं आहे. हमनाही ड्रेस घालून तयार झाली आणि पाकिस्तानला पोहोचली. पण तिथे तिचाच साखरपुडा असल्याचं समजलं.
हमना तिच्या घरच्यांना तिचं म्हणणं पटवून देऊ शकली नाही तेव्हा ती घरातून पळून गेली. तिला लष्कराच्या अधिकाऱ्याची मदत मिळाली. हमनाने बरेच दिवस हॉटेलमध्ये राहून काढले. याच दरम्यान, कोरोना लॉकडाऊन आला. हमनाला वाटले की तिला आता घरी जावं लागेल. पण नंतर क्लाउडिया बर्रेरा या मैत्रिणीने तिला मदत केली. तिला घरी नेले. क्लाउडिया आणि तिच्या नवऱ्याने हमनाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. अखेरीस हमना अमेरिकन हवाई दलात भरती झाली.
क्लाउडिया म्हणाली, तिची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे. पण 5 फूट 2 इंच उंच जफरचा बूट कॅम्प सुरू झाला तेव्हा तिला धक्का बसला. जफरची इच्छा आहे की तिच्या कुटुंबाने तिची क्षमता पाहावी आणि तिचा अभिमान वाटावा, परंतु त्यांच्याशी संपर्क करण्याचा अनेक प्रयत्न करूनही त्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे क्लाउडियाचं कुटुंब आहे, जे तिला मुलीसारखं वागवतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.