Success Story: वडिलांच्या अकाली निधनानं खचला नाही, तर लढला आणि SDM बनून पूर्ण केलं स्वप्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 05:06 PM2022-10-21T17:06:52+5:302022-10-21T17:08:15+5:30
प्रयागराजच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील रहिवासी प्रवीण द्विवेदीने यूपीएससी परीक्षेत ६ वी रँक प्राप्त करत वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
प्रयागराजच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील रहिवासी प्रवीण द्विवेदीने यूपीएससी परीक्षेत ६ वी रँक प्राप्त करत वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लास विना त्यानं अभ्यास केला आणि यश प्राप्त केलं. प्रवीण मध्यम वर्गीय कुटुंबाचं प्रतिनिधीत्व करतो. त्याचे वडील राजेश चंद्र द्विवेदी यूपीच्या फतेहपूर येथे सिंचन विभागात नलकूप चालक पदावर काम करत होते. त्याचं हार्टअटॅकमुळे निधन जालं आणि द्विवेदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरचा आधार हरपला तरी प्रवीणने हार न मानता अभ्यास सुरू ठेवला आणि यश प्राप्त केलं.
वडीलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटूंब फतेहपूरहून प्रयागराज येथे ट्रान्सपोर्ट नगर येथे शिफ्ट झालं. वडीलांच्या जागी त्यांचा मोठा भाऊ सिंचन विभागात नोकरी करू लागला. यामुळेच द्विवेदी कुटुंबाला आधीचं सगळं विसरुन प्रयागराजमध्ये नव्यानं सर्व सुरू करावं लागलं. प्रवीणनं आपल्या वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी तो यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन एसडीएम अधिकारी बनला.
आपल्या मुलानं मोठं अधिकारी व्हावं असं प्रवीणच्या वडीलांचं स्वप्न होतं. हेच स्वप्न आज प्रवीणनं त्यांच्या पश्चात पूर्ण करुन दाखवलं आहे. विशेष म्हणजे, प्रवीणनं कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. स्वत: अभ्यास करुन यश प्राप्त केलं. पण आजही त्याला एकाच गोष्टीची खंत आहे. ती म्हणजे त्याचं आजचं हे यश पाहण्यासाठी त्याचे वडील आज त्याच्यासोबत नाहीत. वडीलांच्या निधनानंतर प्रवीण जवळपास सहा महिने नैराश्यात होता. पण त्यानंतर त्यानं निर्धार केला आणि वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं दिवसरात्र एक केला. यूपीएससी परीक्षेत त्यानं थेट सहावी रँक प्राप्त केली.