वडील तुरुंगात गेले, आईने वाऱ्यावर सोडले; ९ वर्षांच्या चिमुरड्यावर रस्त्यावर राहण्याचे दिवस आले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:22 PM2020-12-16T14:22:49+5:302020-12-16T14:23:59+5:30
homeless Boy living on Footpath : बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे खरं ठरत नाही. आई-वडिलांविना एकटे पडण्याची वेळ जेव्हा मुलांवर येते तेव्हा त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळत असतो.
लखनौ - बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे खरं ठरत नाही. आई-वडिलांविना एकटे पडण्याची वेळ जेव्हा मुलांवर येते तेव्हा त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळत असतो. असाच प्रकार एका नऊ वर्षिय मुलासोबत घडला आहे. अंकित असे या मुलाचे नाव असून, आई-वडिलांपासून दुरावल्याने त्याचे बालपण कोमेजून गेले आहे. आपले आई-वडील कोण, याची माहिती त्याला सांगता येत नाही. मात्र आपले वडील तुरुंगात आहेत आमि आईने त्याला एकटे सोडले आहे, एवढे तो सांगतो. मात्र मात्र एवढ्या छोट्या वयातही अंकितला स्वावलंबित्वाचे वळण लागले आहे. तो फुगे विकून चहाच्या दुकानावर काम करून उदरनिर्वाह करतो.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षांपासून अंकित हा अशाच प्रकारे आपले जीवन जगत आहे. तो दिवसभर काम करतो आणि त्यातून मिळालेल्या कमाईमधून तो स्वत:च्या आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या कुत्र्याच्या उदरभरणाची सोय करतो. तो ज्या चहाच्या दुकानात काम करायचा त्या दुकानाच्या मालकाने सांगितले की, अंकित जेवढा वेळ दुकानात काम करायचा तेवढा वेळ त्याचा कुत्रा एका कोपऱ्यात बसून राहायचा. गरजू असूनही अंकित काहीही फुटकात घेत नसे. अगदी आपल्या कुत्र्यासाठीही कधी कुणाकडून दूध घेत नसे.
काही दिवसांपूर्वी एका बंद दुकानाबाहेर कुत्र्याला आपल्या पांघरुणाखाली घेऊन झोपलेल्या एका छोट्या मुलाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने या मुलाचा शोध सुरू केला होता. अखेर सोमवारी पोलिसांनी या मुलाला शोधून काढले होते. सध्या हा मुलगा मुझफ्फरनगर पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.
याबाबत एसएसपी अभिषेक यांनी सांगितले की, आम्ही या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी अंकितचे फोटो आजूबाजूच्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाठवले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या विनंतीवरून एक खासगी शाळा त्याला मोफत शिक्षण देण्यास तयार झाला आहे.