पित्यालाच दूर सारणार?

By admin | Published: January 7, 2017 04:44 AM2017-01-07T04:44:44+5:302017-01-07T04:44:44+5:30

अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे.

Father will be removed? | पित्यालाच दूर सारणार?

पित्यालाच दूर सारणार?

Next


लखनऊ : समाजवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवपाल यादव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व आपले पुतणे अखिलेश यादव यांची त्यांच्या घरी भेट घेऊन जुळवून घेण्याचे प्रयत्न शुक्रवारी सुरू केले असले तरी अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आता मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू करावा, लखनौमध्ये थांबू नये, अशा सूचना अखिलेश यांनी दिल्या आहेत.
या भेटीबद्दल दोन्ही गटांनी बोलण्यास नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आपणच पक्षाध्यक्ष राहू, उमेदवारांची निवडही आपण करू, अशा अटी अखिलेश यांनी घातल्या आहेत. त्या मान्य असतील, तरच दोन्ही गट एकत्र येतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र या दोन्ही अटी मुलायमसिंग व शिवपाल यांना मान्य नाहीत. शिवपाल हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार असले तरी मुलायमसिंग यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडावे, ही मागणीच त्यांच्या गटाला मान्य नाही. त्यामुळे संभाव्य ‘तडजोडीचे सूत्र’ म्हणून अमरसिंह यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल, अशी चर्चा आहे.
आपल्यामागे संपूर्ण पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाला पटवून देण्यासाठी अखिलेश गटाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र अखिलेश गटाकडे २२९ पैकी २१२ विधानसभेचे तर ६८ पैकी ५६ विधान परिषदेचे सदस्य असून, २४ पैकी १६ खासदार आहेत आणि त्यांनी तशी शपथपत्रे दिली आहेत, अशी माहिती राम गोपाल यादव यांनी दिली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ९ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.
रामगोपाल यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरण
‘सायकल’वरील दाव्यावरून मुुलायमसिंह यादव आणि अखिलेश पिता-पुत्रांत ऐन निवडणुकीच्या काळात संघर्ष निर्माण
झाल्याने दोघांत समेट घडवून आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निष्ठावंत रामगोपाल यादव यांनी आता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे, तसेच अखिलेश समर्थकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर न करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)
>अखिलेश-राहुल भेट होणार
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युतीची मोठी शक्यता आहे. अखिलेश हे राहुल गांधी यांची ९ जानेवारी रोजी भेट घेण्याची अपेक्षा असून तेव्हा निश्चित निर्णय होईल. या चर्चेत प्रियंका गांधीही सहभागी होतील. अखिलेश यांचे पारडे जड झाल्याचे दिसताच सपा व काँग्रेस यांच्यात युतीची शक्यताही निर्माण झाली आहे.

Web Title: Father will be removed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.