'काही महिने सांभाळा, पैसे पाठवतो'; 5 महिन्यांच्या चिमुकल्याला बॅगेत सोडून पित्याचं भावुक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 02:25 PM2020-11-05T14:25:07+5:302020-11-05T14:28:56+5:30
Fathers Emotional Letter : एका पित्याने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला बॅगेत सोडून दिलं आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये घडली आहे. एका पित्याने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला बॅगेत सोडून दिलं आहे. तसेच यासोबतच "माझ्या मुलाचा सहा-सात महिने सांभाळ करा, तुम्हाला पैसे पाठवतो. हात जोडून विनंती करतो की, कृपा करून त्याचा सांभाळ करा. माझी काही असहायता आहे" असं म्हणत भावुक पत्र लिहिलं आहे.
अमेठी पोलिसांनी एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याला झोले येथून ताब्यात घेतलं आहे. मुंशीगंज भागातील त्रिलोकपूर परिसरात पोलिसांनी या चिमुकल्याला ताब्यात घेतलं आहे. बॅगेतून रडण्याचा आवाज आल्यानंतर पीआरव्हीला याबाबतची माहिती दिली. या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मुलाला ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर बुधवारी एक मुलगा बॅगेत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांचं एक पथक मुंशीगंज क्षेत्रातील त्रिलोकपूर भागात राहणाऱ्या आनंद ओझा यांच्या निवासस्थानी पाहोचले.
"हात जोडून विनंती करतो की, कृपा करून त्याचा सांभाळ करा"
एका बॅगेत मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर लोकांनी कंट्रोलरुमला फोन केला. पोलिसांनी बॅग उघडल्यानंतर त्यात एक लहान बाळ, कपडे, बूट, पाच हजार रुपये आणि इतर गरजेच्या वस्तू दिसल्या. तसेच बॅगेत एक पत्र देखील होतं. ते मुलाच्या वडिलांनी लिहिलं होतं. "हा माझा मुलगा आहे, याला मी तुमच्याकडे सहा-सात महिन्यांसाठी सोडत आहे. आम्ही तुमच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. यामुळे मी माझ्या मुलाला तुमच्याजवळ सोडत आहे. मी दरमहा 5000 रुपये पाठवत जाईन. मी आपणास हात जोडून विनंती करतो की, कृपा करून त्याचा सांभाळ करा. माझी काही असहायता आहे, या मुलाची आई नाही"
"तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा"
"माझ्या कुटुंबात मुलाला धोका आहे, म्हणून याला तुम्ही तुमच्याकडे सहा- सात महिन्यांसाठी ठेवा. सर्व काही व्यवस्थित करून मी तुम्हाला भेटेन आणि मुलाला घेऊन जाईन. तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा" असं पित्याने पत्रात म्हटलं आहे. हा मुलगा कोणाचा आहे, त्याला येथे कोणी सोडले, तसेच बॅगेत मुलासोबत सापडलेलं पत्र किती खरं आहे अशा सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.