वडिलांचे भावनिक आवाहन, पण अतिरेक्यांना फुटला नाही पाझर; 3 मुलांसह 6 जणांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 02:54 PM2024-11-18T14:54:57+5:302024-11-18T14:55:09+5:30
जिरीबाममधून अपहरण करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील आई-मुलांसह 6 जणांचे मृतदेह नदीत आढळले.
Manipur Violence : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार वाढला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक निष्पाप लोकांची निर्घृणपणे हत्या करण्यात येत आहे. अशातच, जिरीबाम येथून बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह नदीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सहा जणांचे जिरीबाम कॅम्प येथून अपहरण करण्यात आले होते. या सहापैकी तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी त्यांचे वडील लैश्राम यांनी अतिरेक्यांना भावनिक आवाहनदेखील केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर काही दिवसांपूर्वी मदत शिबिरातून हे सहाजण अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीय बेपत्ता झाल्यानंतर इंफाळमध्ये तैनात भारतीय राखीव बटालियन (IRB)मधील लैश्राम नाईकजीत यांनी कुटुंबीयांच्या सुटकेसाठी भावनिक आवाहन केले होते. पण, सर्वांचे मृतदेह सापडल्यामुळे त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बेपत्ता लोकांमध्ये लैश्राम यांची पत्नी, दोन मुले, सासू आणि पत्नीच्या बहिणीचा समावेश आहे.
'मी खालच्या दर्जाचा सरकारी कर्मचारी आहे'
इंफाळमध्ये तैनात भारतीय राखीव बटालियन (IRB) चे लैश्राम नायकजीत यांनी आज तकशी बोलताना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित परतीसाठी भावनिक आवाहन केले आणि ते निर्दोष असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी भारतीय राखीव बटालियनचा शिपाई आहे, इम्फाळमध्ये तैनात होतो. चकमकीदरम्यान पत्नीने मला कॉल केला होता.
रडत रडत तिने सांगितले होते की, काही सशस्त्र अतिरेक्यांनी त्यांना घेरले आहे. यानंतर अचानक कॉल डिस्कनेक्ट झाला. मी फोन केला तेव्हा फोन बंद आला. माझ्या सासूबाईंचा फोनही बंद होता. सुमारे एक तासानंतर, आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने घरातील सर्वांचे अपहरण झाल्याचे सांगितले. ते सर्व निर्दोष आहेत. माझी दोन मुले अजून बोलूही शकत नाहीत. मोठ्या मुलाचे नुकतेच बोलणे सुरू झाले आहे. कृपया त्यांची सुखरूप सुटका करा, असे आवाहन त्यांनी केले होते.
दरम्यान, जिरीबामच्या जाकुराधोर आणि बोरोबेकडा भागात झालेल्या चकमकीत 10 दहशतवादी मारले गेले आहेत. या चकमकीनंतर मेईतेई समुदायाचे सहा लोक बेपत्ता आहेत, त्यामुळे परिसरात तणाव वाढला आहे.