'साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच प्रचार करू'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:27 AM2019-04-26T10:27:44+5:302019-04-26T10:43:06+5:30
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच त्यांचा प्रचार करू असं एका भाजपा नेत्यानी म्हटलं आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्यांच्या मुस्लीमविरोधी विधानांसाठी माफी मागितली तरच मी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे, असे सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
'मी साध्वी प्रज्ञा यांच्यासाठी प्रचार करणार नाही, त्यांनी धर्मयुद्धासंदर्भात विधान केले होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भातही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते' असे फातिमा यांनी म्हटले आहे. प्रज्ञा यांनी याऐवजी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे होता, असेही फातिमा यांनी यावेळी सुनावले आहे. फातिमा या मध्य प्रदेशचे माजी मंत्री मरहूम रसूल अहमद सिद्दीकी यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मात्र फातिमा यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
Fatima R Siddique, BJP on Sadhvi Pragya: I'm angry with the language she uses to provoke people. We had several faces, Alok Sharma,Alok Sanjar, Vishvas Sarang,Surendranath Singh...She spoke about Karkare ji, instead of this, we should talk about development&work towards it.(25.4) pic.twitter.com/IEXjGNp3Ai
— ANI (@ANI) April 25, 2019
फातिमा रसूल सिद्दीकी या भोपाळमधील भाजपा नेत्या असून विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसच्या आरिफ अकील यांनी फातिमा यांचा पराभव केला होता. 'साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानांमुळे शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. शिवराजसिंह यांचा मुस्लिमांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत' असंही फातिमा यांनी म्हटलं आहे.
दिग्विजय सिंह 'दहशतवादी', साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना दहशतवादी म्हटले आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्याचा नायनाट करण्यासाठी एका संन्यासीनीला निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले आहे, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. सीहोर येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या, " राज्यात 16 वर्षांपूर्वी उमा दिदी (उमा भारती) यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे 16 वर्षापर्यंत ते डोकं वर काढू शकले नव्हते. त्यांना राजकारण ही करता आले नाही. आता पुन्हा त्यांनी डोकं वर काढले तर त्यांना पुन्हा एका संन्यासीनीसोबत सामना करावा लागत आहे. हे त्यांच्याच कर्माचंच फळ आहे." याआधी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही होत आहे.