हार्ट अटॅकपेक्षा घातक फॅटी लिव्हरचे मुलेही बळी; बदलती जीवनशैली ठरतेय घातक; इतर विकारांचाही वाढता धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:00 AM2023-05-18T11:00:39+5:302023-05-18T11:01:23+5:30
आठ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनादेखील मसालेदार आणि गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे.
नवी दिल्ली : दारू पिणाऱ्यांनाच यकृताचा आजार होतो, असा तुम्ही विचार करीत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण मद्यपान करणाऱ्यांपैकी फक्त एक तृतीयांश लोकांना यकृताचा त्रास होतो, तर उरलेल्या लोकांना लठ्ठपणा, असंतुलित आहार, मधुमेह, हृदय, अतिकोलेस्टेरॉल, थायरॉईड, हृदयरोग यांसह इतर आजारांमुळे लिव्हर सिरोसिस आणि नॉन-अल्कोहोल यकृत रोग होतात. आठ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनादेखील मसालेदार आणि गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे.
आजकाल कोणत्याही सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएंटोरोलॉजी विभागाच्या ओपीडीमध्ये फॅटी लिव्हरचे रुग्ण सातत्याने पाहायला मिळत आहेत. ओपीडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दहाव्या व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेषत: ‘हिपॅटायटिस-बी’ आणि ‘सी’ हे सुरुवातीला माहीत नसतात. माहिती मिळेपर्यंत या आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले असते.
हा आजार मुळात जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे आता तरुणांनाच नाही तर लहान मुलांनाही फॅटी लिव्हरची समस्या भेडसावत आहे. यामध्ये आठ ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. जंकफूड आणि फास्टफूडव्यतिरिक्त घरांमध्ये मसालेदार, गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढला आहे. याशिवाय त्यांची शारीरिक हालचाल कमी होणे हेही एक मोठे कारण आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर या आजाराचे रुग्ण १५ टक्क्यांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ते हृदयविकारापेक्षाही धोकादायक आहे.
काळजी काय घ्याल?
- वजन आणि आहारावर नियंत्रण ठेवा
- कार्बोहायड्रेट आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन
- मांसाहार आणि दारूचे सेवन करू नका
- दररोज ४५ मिनिटे व्यायाम करावा
लक्षणे...
- सतत थकवा येणे
- पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे आणि सूज येणे
तीन टक्के रुग्ण समस्यांनी ग्रस्त
फॅटी लिव्हरच्या रुग्णांमध्ये ३० वर्षांपर्यंतची मुले आणि तरुणांचा समावेश आहे. संपूर्ण पोटाच्या अल्ट्रासाउंडसाठी १०० रुग्णांची तपासणी केली असता १० पेक्षा जास्त रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर आढळून येतात. यातील दोन ते तीन टक्के रुग्ण गंभीर समस्यांनी ग्रस्त आहेत.