श्रीराम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या इमाम इलियासी यांच्याविरोधात फतवा जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 09:52 PM2024-01-29T21:52:33+5:302024-01-29T21:54:22+5:30
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनी श्रीराम मंदिर सोहळ्याला हजेरी लावली होती.
Ram Mandir : श्रीराम जन्मभूमी अयोध्येत 22 जानेवारी रोजी नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या सोहळ्यात ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम, डॉ. उमर अहमद इलियासी (Imam Umer Ahmed) यांनीही हजेरी लावली होती. व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये त्यांचा समावेश होता. पण, आता त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजातूनच फतवा जारी करण्यात आला आहे. या फतव्याविरोधात इलियासी यांनीही सडेतोड उत्तर दिले.
आपल्या विरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्याबाबत उमर अहमद इलियासी म्हणाले, 'मुख्य इमाम या नात्याने मला श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते. दोन दिवस विचार केल्यानंतर मी अयोध्येला जायचे ठरले. हा फतवा काल काढण्यात आला, पण मला 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे फोन येत आहेत."
#WATCH | Delhi | Fatwa issued against Chief Imam of All India Imam Organization, Dr Imam Umer Ahmed Ilyasi after he attended the Pranpratishtha ceremony of Ram Lalla at Ram Temple in Ayodhya.
— ANI (@ANI) January 29, 2024
He says, "As a chief Imam, I received the invitation from Shri Ram Janmbhoomi Teerth… pic.twitter.com/iVe2bA3s1X
'माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं'
ते पुढे म्हणाले, 'मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत, ज्यात कॉल करणाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर आणि देशावर प्रेम करणारे मला साथ देतील. मी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं. मी प्रेमाचा संदेश दिला आहे, कोणताही गुन्हा केला नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामाही देणार नाही. धमक्या देणारे त्यांना हवं ते करू शकतात.'
फतव्यात काय म्हटले?
इलियासी यांच्याविरोधातील फतव्यात म्हटले की, 'राम मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही मौलाना जमील इलियासी यांचे पुत्र आणि मेवातच्या एका प्रसिद्ध धर्मोपदेशक कुटुंबातील आहात, याचा विचार केला नाही का? तुम्ही कधीपासून इमामांचे प्रमुख झाला? फक्त हिंदूंना खूश करण्यासाठी तिथे गेला होतात.' एवढंच नाही तर या फतव्यात इमामांविरोधात इतर अनेक गोष्टी म्हटल्या आहेत. याशिवाय त्यांच्या इमाम असण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.