फौजिया खान, शिबू सोरेन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:04 AM2020-09-15T01:04:37+5:302020-09-15T01:05:10+5:30
खान यांच्यासमवेत विविध राज्यांमधील १५ जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉ. फौजिया खान यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर, डिजिटल कामकाजाचा प्रभाव संसदेत दिसला. खान यांच्यासमवेत विविध राज्यांमधील १५ जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
त्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी, द्रमुकचे तिरूची शिवा व भाजप प्रवक्ते सय्यद झफर इस्लाम यांचा समावेश होता.
काँग्रेसच्या फुलो देवी नेताम, एम. व्ही. श्रेयमस कुमार (लोकतांत्रिक जनता दल), वालवेरॉय खारलुकी (नॅशनलिस्ट पीपल्स पार्टी), एनआर एलांगो, ए. पी. सेलवारसू (द्रमुक), के. केशव राव, के. आर. सुरेश रेड्डी ( तेलंगण राष्ट्र समिती), जयप्रकाश निषाद (भाजप) व तृणमूल काँग्रेसच्या अर्पित घोष यांनी शपथ घेतली.
अधिवेशनाच्या उत्साहावर कोरोनाचे सावटही दिसले. एरवी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीने शपथ घेतल्यावर त्याचे हस्तांदोलन करून अभिनंदनाची प्रथाही यंदा बदललेली दिसली. खासदार, राज्यसभेचे महासचिव देश दीपक वर्मा यांनीदेखील नूतन खासदारांशी हस्तांदोलन टाळले. उप-सभापतींच्या निवडीनंतर पक्षनेत्यांनी जागेवर बसूनच भाषण करणे पसंत केले. प्रत्येक खासदाराने मास्क परिधान केला होता.
कामकाजातून पुरेसा वेळ काढून खासदार संसद कॉरिडॉरमध्ये असलेल्या टी व कॉफी बोर्डाच्या सेवेचाही लाभ घेतात. कामकाज तहकूब झाल्यानंतर खासदारांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या तर काही खासदार थेट निवासस्थानी गेले.