गर्भाच्या हृदयात दोष, वाईच्या महिलेस सहाव्या महिन्यात गर्भपाताची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:49 AM2017-08-11T03:49:20+5:302017-08-11T03:49:30+5:30
पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फार दिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या महिन्यात गर्भपात करून घेण्याची अनुमती गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पोटात वाढत असलेल्या मुलाच्या हृदयात गंभीर स्वरूपाचे दोष आहेत व असे मूल जन्माला आले तरी ते फार दिवस जगू शकणार नाही, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एका २४ वर्षांच्या विवाहितेस सहाव्या महिन्यात गर्भपात करून घेण्याची अनुमती गुरुवारी दिली.
वाई तालुक्यातील वावधन गावात नवीन वसाहतीत साई मंदिराजवळ राहणाºया या गर्भवतीने केलेल्या रिट याचिकेवर न्यायालयाने पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रदीप सांबरे व बाल हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. नित्यांनंद ठाकूर यांनी याचिकाकर्तीची तपासणी करून अहवाल द्यावा, असा आदेश ४ आॅगस्ट रोजी दिला होता.
त्यानुसार डॉ. सांबरे व डॉ. ठाकूर यांच्याखेरीज बी.जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अंजय चंदनवाले, बालरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. आरती किणीकर व रेडिओलॉजी विभागाच्या प्राध्यापक डॉ. शेफाली पवार यांच्या मेडिकल बोर्डाने ७ आॅगस्ट रोजी या महिलेची तपासणी करून न्यायालयास अहवाल दिला. असे मूल जन्माला आले तर त्याच्या हृदयावर जोखमीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील व त्यात मूल दगावण्याचाही धोका आहे. शिवाय असे मूल काही काळ जगले तरी रक्तास पुरेशा आॅक्सिजन पुरवठ्याअभावी त्याचे आयुष्य अत्यंत खडतर असेल व ते तारुण्यावस्थेपर्यंत जगणे अशक्य वाटते, असे मत या डॉक्टरांनी अहवालात नमूद केले.
न्या. शरद बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने या अहवालाखेरीज बंगळुरु येथील ख्यातनाम शल्यचिकित्सक डॉ. देवी शेट्टी यांनी व्यक्त केलेले तशाच स्वरूपाचे मतही विचारात घेतले. जन्माला येणाºया मुलामध्ये गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येऊ शकेल असे दोष असल्याचे मत दोनहून अधिक डॉक्टरांनी दिले तर गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२) (बी) नुसार पाचव्या महिन्यांपर्यंत गर्भपात केला जाऊ शकतो, असे खंडपीठाने म्हटले.
आठ दिवसांत न्याय
वाईसारख्या ग्रामीण भागातील या महिलेला एक हजार किमीहून अधिक दूर असलेल्या दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाकडून मोजून आठव्या दिवशी न्याय मिळाला. २ आॅगस्ट रोजी दाखल केलेली तिची याचिका ४ आॅगस्टला प्रथम सुनावणीस आली. त्या दिवशी तपासणीचा आदेश झाला. ७ आॅगस्टला तपासणी झाली व १० आॅगस्टला गर्भपाताची परवानगी मिळाली.