देशातील सुरक्षा संस्थांमध्ये दोष!

By admin | Published: May 4, 2016 02:12 AM2016-05-04T02:12:41+5:302016-05-04T02:12:41+5:30

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अ‍ॅलर्ट दिला असताना पठाणकोट हवाई दलाच्या तळापर्यंत दहशतवादी पोहोचलेच कसे, असा सवाल करतानाच, दहशतवादी हल्ला रोखण्यास

Fault in security organizations in the country! | देशातील सुरक्षा संस्थांमध्ये दोष!

देशातील सुरक्षा संस्थांमध्ये दोष!

Next

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा अ‍ॅलर्ट दिला असताना पठाणकोट हवाई दलाच्या तळापर्यंत दहशतवादी पोहोचलेच कसे, असा सवाल करतानाच, दहशतवादी हल्ला रोखण्यास अपयशी ठरले, अशा शब्दांत संसदीय समितीने केंद्र सरकारला फटकारले आहे. देशाच्या दहशतवादविरोधी सुरक्षा संस्थांमध्ये गंभीर दोष असल्याचा व पठाणकोट हवाईतळावर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला नसल्याचा ठपका या समितीने केंद्र सरकारवर ठेवला आहे.
गृहमंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीने मंगळवारी संसदेत सादर केलेल्या या अहवालात २ जानेवारीच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून संशय व्यक्त केला आहे. हल्ल्याबाबत सतर्क करण्यात आल्यानंतरही दहशतवादी उच्च सुरक्षा असलेल्या हवाई तळाचे सुरक्षा कवच भेदून आत कसे शिरले आणि हल्ला केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही असे म्हटले आहे. दहशतवाद्यांद्वारे अपहृत आणि नंतर सोडण्यात आलेले पठाणकोटचे पोलीस अधीक्षक व त्यांच्या मित्रांकडून मिळालेली विश्वसनीय आणि ठोस गोपनीय सूचना तसेच हल्लेखोर दहशतवादी व त्यांच्या म्होरक्यांदरम्यान हल्ल्याबाबत झालेले संभाषण हाती लागल्यावरही सुरक्षा संस्थांना धोक्याची जाणीव होऊ शकली नाही एवढी त्यांची तयारी वाईट होती. (वृत्तसंस्था)

हल्ल्यासंबंधी समितीची निरीक्षणे
आमच्या दहशतवादविरोधी सुरक्षा संस्थांमध्ये काही गंभीर दोष आहेत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या हवाईदल तळाच्या परिसरातील भिंतीजवळ एकही रस्ता नाही. त्या ठिकाणी उंच उंच झाडेझुडपे पसरली आहेत. यामुळे दहशतवाद्यांना लपण्यास मदत झाली आणि सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना पिटाळून लावण्यात अडचण निर्माण झाली.

समितीची सूचना
सीमा क्षेत्रात गस्त वाढवून कुंपण आणि फ्लडलाइट्स बसविण्याच्या कामाची गांभीर्याने दखल घेतली जावी. पठाणकोट हवाईदल तळ उच्च सुरक्षा क्षेत्र घोषित करण्यात यावे, अशी सूचना समितीने केली. सरकारने कुठल्या आधारे या हल्ला प्रकरणाच्या चौकशीत पाकिस्तानची मदत घेण्याचा विचार केला आणि त्या देशाच्या संयुक्त चौकशी पथकाला भारताचे आमंत्रण दिले, हे जाणून घेण्याची इच्छा समितीने व्यक्त केली आहे.

1हवाईदल तळावरील सुरक्षा बंदोबस्त चोख नाही. सभोवतालच्या भिंतीची देखरेख व्यवस्था अत्यंत वाईट आहे.
2दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता याबद्दल दुमत नाही. हल्लेखोर आणि त्यांच्या पाकी म्होरक्यांदरम्यानच्या संभाषणावरून हे
सिद्ध होते. दहशतवाद्यांकडून जप्त केलेली शस्त्रास्त्रे व दारुगोळ्यावरही पाकचे चिन्ह.
3पाकमधील सुरक्षा व गुप्तचर संस्थांच्या मदतीशिवाय हा हल्ला शक्य नव्हता. सीमेवर कुंपण, फ्लडलाइट्स आणि सीमा सुरक्षा दल जवानांची गस्त असतानाही पाकिस्तानी दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसण्यास यशस्वी ठरले.
4 पंजाबच्या सीमा क्षेत्रात सक्रिय
अमली पदार्थांच्या सिंडिकेटच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.

Web Title: Fault in security organizations in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.