फैयाजचे मारेकरी हिजबूल, तैयबाचे
By Admin | Published: May 11, 2017 11:23 PM2017-05-11T23:23:17+5:302017-05-11T23:27:58+5:30
दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची सहा अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - दक्षिण काश्मीरच्या सोपियान जिल्ह्यात उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची सहा अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली आणि ते पाकिस्तानमधल्या हिजबूल-मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तय्यबाचे होते, असे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे. लष्कराच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल, याची खात्री आहे.
काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एस. जे. एम. गिलानी म्हणाले की, फैयाज यांची हत्या झाली तेथे इन्सास रायफलच्या गोळ्यांच्या पुंगळ्या मिळाल्या होत्या. गेल्या काही दिवसांत कुलगाम आणि सोपियान येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांकडून अशा रायफली पळविल्या होत्या. कुलगाममध्ये लष्कराच्या तर सोपियानमध्ये तय्यबाच्या दहशतवाद्यांनी ही लूट केली होती. त्यामुळे लुटलेल्या त्या रायफलचाच फैयाज यांच्या हत्येसाठी वापर केला गेला आणि यात लष्कर आणि तयबाचे अतिरेकी होते, असा सुगावा मिळतो. ही हत्या हिजबुल मुजाहिदीनच्या सहा दहशतवाद्यांनी घडवल्याची पक्की खबर सुरक्षा यंत्रणांना लागली असून लवकरच या दहशतवाद्यांना जिवंत वा मृत पकडलं जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.
फैयाज यांच्या हत्येबाबत काश्मीरमधील नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. स्थानिक लोक लष्करासोबत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. फैयाज यांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेल्या दगडफेकीमागे चिथावणीखोरांचा हात असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.