उलगडला फैय्याज यांचा सुरेल प्रवास
By admin | Published: February 8, 2015 02:43 AM2015-02-08T02:43:20+5:302015-02-08T02:43:20+5:30
शास्त्रीय, नाट्यगायन ते बैठकीची लावणी असा एक सुरेल प्रवास रसिकांनी अनुभवला. निमित्त होते ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या मुलाखतीचे.
प्रसन्न पाध्ये - बेळगाव
सदाशिव अमरापूरकर सभागृह : शास्त्रीय, नाट्यगायन ते बैठकीची लावणी असा एक सुरेल प्रवास रसिकांनी अनुभवला. निमित्त होते ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या मुलाखतीचे. उत्तरोत्तर रंगत गेलेली ही शब्द सुरांची मैफल हृदयाचा ठाव घेणारी ठरली.
नाट्य संमेलनाअंतर्गत फैय्याज यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम झाला. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांना बोलते केले. तसेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक, अशोक देशपांडे आणि आसावरी भोकरे यांनीही त्यांच्याशीसंवाद साधला.
आई गळा चांगला होता, पण बालपण आजीकडे गेल्याने तसा संगीत, नाटकाचा वारसा आपल्याला नाही. लेखन वाचनाची आवड होती. मलाही गाण्याचे वेड आहे, हे समजल्यापासून तंबोरे खुंटीला टांगले गेले. त्यामुळे वारसा असा नाही, असे फैयाज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कालावधीत नाट्य परिषदेकडून काय करुन घ्यायला आवडेल या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘‘अध्यक्षपदाला अधिकार किती आहेत, हे माहिती नाही. मात्र संगीत रंगभूमीसाठी अधिक प्रयत्न करायला आवडेल. नाट्य परिषदेने कार्यशाळा भरविल्यास शिकवायला निश्चित आवडेल. नव्या कलाकारांना गाण्याचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. षड्ज कसा लावला पाहिजे हे त्यांनी उदाहरणासह सांगितले.
‘मत्सगंधा’ची आठवण सांगतांना त्यांनी मत्सगंधातील गाणी आशाबार्इंनी गायली होती. पण मला माझं गाणं म्हणून गायचे होते. त्या प्रमाणे मी ते गायले, असे सांगितले.
संगीत रंगभूमी हा आपला ठेवा आहे. तो जपलाच पाहिजे. पण काळानुरुप सादरीकरणात बदल केले पाहिजेत.
नाटकाला ट्रॅकवर संगीत देण्यात काही वावगे नाही,असे त्यांनी ‘लेकुरे उदंड..’चे उदाहरण दिले. आजच्या तरुणाईला काय हवे याचा विचार केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फैयाज यांना नकला करण्याची गोडी आहे. तोही प्रश्न या मुलाखती दरम्यान आला. त्या वेळी त्यांनी पणशीकर, वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा याच बरोबर दादा कोंडके यांचीही नक्कल करुन दाखविली. ‘विच्छा..’च्या वेळीच्या प्रसंगांना उजाळा देतांना त्यांनी आशातार्इंनी कुंकू लावण्यास सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली. बेगम अख्तर यांची गझल सादर करुन त्यांनी शब्दमैफलीचा समारोप केला.