थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला
By admin | Published: April 28, 2015 11:47 PM2015-04-28T23:47:49+5:302015-04-28T23:47:49+5:30
देशात फेब्रुवारी २०१५ मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ ६३ टक्क्यांनी वाढून ३.२८ अब्ज डॉलरवर, अर्थात २०,८२० कोटी रुपयांवर पोहोचला.
नवी दिल्ली : देशात फेब्रुवारी २०१५ मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ ६३ टक्क्यांनी वाढून ३.२८ अब्ज डॉलरवर, अर्थात २०,८२० कोटी रुपयांवर पोहोचला. फेब्रुवारी २०१४ मध्ये देशात २.०१ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती.
२०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते फेबु्रवारी या कालावधीत विदेशी गुंतवणुकीचा ओघ ३९ टक्क्यांनी वाढून २८.८१ अब्ज डॉलर झाला. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा २०.७६ अब्ज डॉलर एवढा होता. औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. २०१४-१५च्या पहिल्या ११ महिन्यांत सेवा क्षेत्र (२.८८ अब्ज डॉलर), दूरसंचार (२.८५ अब्ज डॉलर), वाहन (२.४२ अब्ज डॉलर), कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर (२.०४ अब्ज डॉलर) आणि औषधी (१.३० अब्ज डॉलर) या क्षेत्रात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली.
या कालावधीत देशात सर्वाधिक ८.४४ अब्ज डॉलरची गुंतवणूक मॉरिशस येथून आली. त्याखालोखाल सिंगापूरहून ६.४२ अब्ज डॉलर, नेदरलँडहून ३.२९ अब्ज डॉलर, जपानहून १.७२ अब्ज डॉलर आणि अमेरिकेहून १.६९ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली. २०१३-१४ मध्ये देशात २४.२९ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती.