भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 05:32 AM2019-02-23T05:32:13+5:302019-02-23T05:33:13+5:30

लष्कराने सुरू केली तयारी : रुग्णालयांत जवानांसाठी २५ टक्के खाटा ठेवण्याचे आदेश

Fear of attack on India; Cautions made by people near the border | भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

श्रीनगर : पुलवामाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या भारताकडून हल्ले होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये धावपळ सुरू झाली आहे. पाक सरकारने खासगी व सरकारी २५ टक्के खाटा जवानांसाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील नीलम, झेलम, रावळकोट, हवेली, भीमबेर या भागातील लोकांना हल्ल्यांपासून सतर्क राहाण्याचा इशारा दिला असून, रात्री शक्यतो दिवे लावू नका, अशाही सूचना केल्या आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या बलुचिस्तानमधील एका छावणीतला दस्तावेज तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाला सरकारने पाठविलेले पत्रातून ही माहिती उघड झाली. भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याची तयारी केली असल्याचे या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. भारताशी होणारे संभाव्य युद्ध लक्षात घेऊन सर्व वैद्यकीय सुविधांनिशी सुसज्ज राहावे, असे पत्र क्वेट्टा येथील लष्करी तळाने सिंध व पंजाब प्रांतातील लष्करी व अन्य रुग्णालयांना पाठविले आहे. बलुचिस्तानमध्ये पाकसरकारविरोधी भावना प्रबळ आहे. त्यामुळे तिथे आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून पाकिस्तान सरकार अधिकच लक्ष देत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर काय कारवाई करायची याचे संपूर्ण अधिकार लष्कराला दिले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्यावर भारताने हल्ला केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल्, असा इशारा पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला होता. भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता लक्षात घेऊन सीमेजवळील सर्व दहशतवादी तळ पाकिस्तानने आपल्या लष्करी छावण्यांजवळ हलविले आहेत. त्यामुळे भारताने हल्ला चढविल्यास त्यांची थेट पाकिस्तानी सैन्याशी गाठ पडेल.

काश्मिरी अतिरेक्यांना उत्तर प्रदेशातून अटक

लखनऊ : जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे अटक करण्यात आली. त्यापैकी एक कुलगामचा शहानवाज अहमद तेली व दुसरा पुलवामातील अकीब अहमद मलिक आहे. जैश-ए-मोहम्मदमध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम हे दोघे करत. त्यांचा १४ फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभाग आहे का असे विचारता पोलिसांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्याआधी ते इथे का आले, चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिक काही माहिती सांगता येईल.

पाकिस्तानमध्ये
६९ संघटनांवर बंदी
इस्लामाबाद : मुंबईवर २००८ साली झालेल्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन यासह ६९ दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने आजवर बंदी घातली आहे. भारताने बंदी घातलेल्या निम्म्याहून अधिक संघटनांना पाकिस्तानातील दहशतवादी गटांकडून मदत मिळत होती.

काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सोपोरच्या वारपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी तिथे शोधमोहिम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांना सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.


 

Web Title: Fear of attack on India; Cautions made by people near the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.