वीजटंचाईमुळे Delhi अंधारात जाण्याची भीती, Arvind Kejriwal यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना लिहिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 07:01 AM2021-10-10T07:01:14+5:302021-10-10T07:02:02+5:30
Arvind Kejriwal News: देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे. या संकटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहून या गंभीर समस्येमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. दिल्लीच नव्हेतर, अनेक राज्यांवर वीजटंचाईचे सावट आहे.
केजरीवाल यांनी दिल्लीतील वीज संकटाकडे पंतप्रधान माेदी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले आहे, की केंद्रीय वीज नियामक आयाेगानुसार ऊर्जा प्रकल्पांना १० ते २० दिवस पुरेल एवढा काेळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. मात्र, ५ प्रकल्पांकडे जेमतेम एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे. त्यामुळे वायूवर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवर ताण पडत आहे. अशीच स्थिती राहिल्यास दिल्लीवर भीषण वीज संकट ओढावेल, असे केजरीवाल यांनी लिहिले आहे.
काळजीपूर्वक वीजवापराच्या सूचना
दिल्लीत शनिवारपासूनच वीजटंचाई निर्माण झाली आहे. टाटा पॉवर तसेच टीपीडीडीएल यांनी दिल्लीतील वीज ग्राहकांना एसएमएस पाठवून काळजीपूर्वक वीजवापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.