वाचिक भाषा संपण्याची भीती
By admin | Published: April 6, 2015 02:54 AM2015-04-06T02:54:04+5:302015-04-06T02:54:04+5:30
भाषांचा इतिहास हा सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. मात्र, आता प्रतिमांची नवी भाषा विकसित होत आहे. भविष्यात भाषा मृत होऊन केवळ प्रतिमांच्या उपयोगातून एक
नम्रता फडणीस, घुमान (संत नामदेवनगरी)
भाषांचा इतिहास हा सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. मात्र, आता प्रतिमांची नवी भाषा विकसित होत आहे. भविष्यात भाषा मृत होऊन केवळ प्रतिमांच्या उपयोगातून एक नवीन बुद्धीवंत प्राणी उदयास येणार आहे. त्यामुळे भाषांचे संगणीकरणाच्या माध्यमातून जतन करणे आवश्यक ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ भाषा संशोधक गणेशदेवी यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
संमेलनात गणेशदेवी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. प्रकाशक अरूण जाखडे आणि डॉ. सुषमा करोगल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय साहित्य अनेक जीभेने बोलले जाते. मराठी साहित्य हा त्यामधीलच एक अद्भूत अविष्कार असल्याचे सांगून गणेशदेवी म्हणाले, मराठी साहित्यामध्ये जे स्त्रीलेखन झाले ते खरच खूप अप्रतिम आहे. कवितांमध्येही विभिन्न अविष्कारांचे दर्शन घडते. तर, गुजराती भाषेमध्ये लघुकथा हा साहित्यप्रकार चांगला आहे. परंतु कुठल्या भाषेला किती मार्क द्यायचे एवढे काही आपण तज्ज्ञ नसल्याचे सांगत आपल्या मोठेपणाची पावतीही त्यांनी उपस्थितांना दिली.
भाषेच्या भविष्यावर भाष्य करताना ते म्हणाले, उत्क्रांती मानवाच्या मेंदूत बदल घडत असून, मेंदूचा डाव्या बाजूचा केंद्रबिंदू भाषा नव्हे तर प्रतिमांकडे सरकत चालला आहे. त्यामुळे भाषा मृतवत होऊन रूपक आणि प्रतिकांची ‘व्हर्च्युअल’ (आभासी) भाषा निर्माण होत चालली आहे.
त्यामुळे वाचिक भाषा संपेल अशी भिती शास्त्रज्ञांना वाटत आहे. हे प्रदीर्घ काळातील टप्पे असून, त्याच्या एका अंकाच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. यासाठी भाषांचे जतन करणे ही आता काळाची गरज ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.