‘आप’विषयी चाहत्यांचा भ्रमनिरास
By admin | Published: April 9, 2015 12:44 AM2015-04-09T00:44:25+5:302015-04-09T05:33:35+5:30
भारताच्या राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे उदयास आलेल्या आम आदमी पार्टीवर (आप) लट्टू होऊन देणग्यांचा मुक्तहस्ते वर्षाव
नवी दिल्ली : भारताच्या राजकीय क्षितिजावर धूमकेतूप्रमाणे उदयास आलेल्या आम आदमी पार्टीवर (आप) लट्टू होऊन देणग्यांचा मुक्तहस्ते वर्षाव करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व चाहत्यांचा अलिकडच्या पक्षांतर्गत कलहामुळे भ्रमनिरास होत चालला आहे. यातूनच इंग्लंडमधील एका अनिवासी भारतीय दात्याने पक्षाला वापरण्यासाठी दिलेली व अरविंद केजरीवाल यांची जणू काही ओळख बनलेली निळ््या रंगाची वॅगनआर गाडी परत मागितली आहे. तर लखनऊ येथील एका पक्षसदस्याने आपण तयार करून दिलेल्या बोधचिन्हाचा (लोगो) पक्षाने तात्काळ बंद करावा, असे पत्र केजरीवाल यांना पाठविले आहे.
ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले एक चाहते कुंदन शर्मा यांनी आपल्या पत्नीच्या नावे असलेली निळ््या रंगाची वॅगनआर गाडी केजरीवाल यांना वापरण्यासाठी दिली होती. गेले दोन दिवस दिल्लीत आलेल्या शर्मा यांनी एकापाठोपाठ एक अनेक टिष्ट्वट करत ही मोटार परत देण्याची मागणी केली.
दुसऱ्या असंतुष्ट कार्यकत्याचे नाव सुनील लाल असे असून आपचे चिन्ह आपण तयार केले असल्याचा त्यांचा दावा आहे.या डिझाईनचे हक्क अद्याप मी हस्तांतरित केले नसल्याने पक्षाने या चिन्हाचा वापर त्वरित थांबवावा. ब्रांडिंग, वेबसाईट, स्टेशनरी, ध्वज, फलक या सर्वांवरून हे चिन्ह काढून टाकावे, असे पत्र त्यांनी केजरीवालांना पाठविले आहे. प्रशांत भूषण, योगेंद्र यादव व आनंदकुमार यांच्यावरील कारवाईने सुनीललाल नाराज आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)