‘एआय’मुळे कोर्टाच्या कामकाजात नैतिक गुंतागुंत येण्याची भीती; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:11 AM2024-04-14T05:11:41+5:302024-04-14T05:14:16+5:30
भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजासह आधुनिक प्रक्रियांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यास नैतिक, कायदेशीर आणि व्यावहारिक स्वरूपाचे असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील, त्यावर तोडगा काढूनच पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी केले.
भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन आणि असंख्य अन्य न्यायमूर्ती व तज्ज्ञांची परिषदेला उपस्थिती होती.
सरन्यायाधीश म्हणाले की, कायदा व्यावसायिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता एआयमध्ये आहे. कायदेशीर संशोधन आणि खटला विश्लेषण यात सुधारणा होऊन न्यायालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढेल. काही नवीन संधीही निर्माण होतील. कामकाजात अभूतपूर्व अचूकता येईल. त्यामुळे एआयचा न्यायालयीन वापर आपण टाळू शकणार नाही. सरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की, असे असले तरी एआयचा न्यायालयीन कामकाजात वापर सुरू केल्यास काही गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
...तर न्यायाचा गर्भपात
सरन्यायाधीशांनी सांगितले की, एआयकडून चुकाही होऊ शकतात. चुकीची आणि दिशाभूल करणारे प्रतिसाद येऊ शकतात. त्यातून संवेदनशील प्रकरणांत अयोग्य सल्ला दिला जाण्याचा धोका आहे. असे झाले, तर न्यायाचाच गर्भपात होईल. एआयचा वापर करण्यापूर्वी यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यावर उपाय शोधावे लागतील.