पनामाला सतावतेय प्रतिमेची भीती

By admin | Published: April 5, 2016 12:21 AM2016-04-05T00:21:05+5:302016-04-05T00:21:05+5:30

विधी संस्थेतून फुटलेल्या दस्तावेजातून जगभरातील अनेक नेते, प्रमुख खेळाडू आणि इतर नामवंतांनी अब्जावधी डॉलरचे घबाड पनामात लपविले असल्याचे संकेत आहेत.

Fear of Panathala Rotational Image | पनामाला सतावतेय प्रतिमेची भीती

पनामाला सतावतेय प्रतिमेची भीती

Next

पनामा सिटी : विधी संस्थेतून फुटलेल्या दस्तावेजातून जगभरातील अनेक नेते, प्रमुख खेळाडू आणि इतर नामवंतांनी अब्जावधी डॉलरचे घबाड पनामात लपविले असल्याचे संकेत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर करचोरांचे आश्रयस्थान किंवा हवाला व्यवहाराचे मोठे केंद्र अशी पनामाची प्रतिमा बनण्याची भीती आहे. पनामा हा छोटा देश असून त्याची लोकसंख्या केवळ ४० लाख आहे. प्रसिद्ध पनामा कालवा हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. पनामाने आपली प्रतिमा बदलण्यासाठी अलीकडे पावले उचलली होती. तथापि, रविवारच्या खुलाशानंतर देशाने प्रतिमा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो.
पूर्ण बेकायदेशीर?
या प्रकरणात ज्यांची नावे समोर आली आहेत तो व्यवहार पूर्ण बेकायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आयसीआयजेचे म्हणणे आहे की, हे बेकायदेशीर असू शकते. अर्थात हे पूर्णपणे बेकायदेशीर नसले तरी हे स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे या बड्या लोकांनी कर वाचविण्याचा प्रयत्न करून देशाचे नुकसान केले आहे.
कशासाठी विदेशी खाते?
मोठे लोक देशाबाहेर जी खाती उघडतात त्यामागे देशातील बँकिंग व्यवस्थेपासून लपवून पैसा बाहेर नेणे आणि टॅक्स वाचविणे हा हेतू असतो.
>> काय आहे पनामा प्रकरण?
जगभरातील नेते, उद्योजक, खेळाडू आणि अभिनेते आदींनी कथितरित्या कर वाचविण्यासाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी परदेशात केलेल्या गुंतवणूकीबाबतची लाखो कागदपत्रे फुटली आहेत. शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय महासंघाने (आयसीआयजे)ही कागदपत्रे समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या ४० वर्षांतील माहिती यात आहे. जर्मनीतील एका वर्तमानपत्राने म्हटले आहे की, यातून २.६ टेराबाईट डेटा समोर आला आहे, जो की ६०० डीव्हीडीत समाविष्ट होऊ शकतो. जगभरातील किमान १४० बड्या नेत्यांनीही संपत्ती लपविल्याचे यातून समोर आले आहे.
>>>>>शरीफांभोवती वादळ
इस्लामाबाद : पनामा कागदपत्रांमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या तीन अपत्यांची नावे असल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानात राजकीय वादळ आले असून, विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. कागदपत्रांनुसार, शरीफ यांची अपत्ये एकतर विदेशातील कंपन्यांचे मालक आहेत किंवा या कंपन्यांच्या व्यवहाराचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. शरीफ यांचे पुत्र हुसैन नवाज म्हणाले की, माझ्या परदेशात कंपन्या असल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे. पंतप्रधान शरीफ यांचे नाव नाहक यात ओढण्यात येत आहे.
>प्रतिमेला तडा
बीजिंग : परदेशात संपत्ती दडविणाऱ्यांमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळच्या नातेवाईकासह सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाच्या आठ विद्यमान किंवा माजी सदस्यांचा समावेश आहे. जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. परंतु पनामा पेपरफुटीमुळे त्यांच्या या प्रतिमेला तडा जाऊ शकतो.‘पुतीन हे लक्ष्य’
मॉस्को : राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पनामा कागदपत्र फुटीचे प्रमुख लक्ष्य होते, असे सांगत रशियाने सोमवारी या प्रकरणावर हल्लाबोल केला. फुटलेल्या पनामा कागदपत्रांचे रशियन पत्रकारांनी विश्लेषण केल्यानंतर पुतीन यांचे एक घनिष्ठ मित्र परदेशात गुंतवणूक असलेल्या रशियन धनाढ्यांत सर्वात अग्रस्थानी असल्याचे आढळून आले.

Web Title: Fear of Panathala Rotational Image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.