दहशतवादाचा धोका कायम, सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याची भीती, व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:51 AM2017-12-02T05:51:25+5:302017-12-02T05:52:10+5:30
मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, २६/११च्या दहशतवाद्यांनी छोट्या बोटीतूनच हल्ला केला होता.
नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’वर आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश लुथरा बोलत होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जहाजांवर ओळख पटविण्याची अद्ययावत यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. खलाशी व मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ७० ते ८० टक्के मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत. मोठ्या व मध्यम आकाराच्या जहाजांची ओळख पटविणे, नौकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, छोट्या बोटी व होड्यांवर अद्याप अशी यंत्रणा बसविण्याचे काम शिल्लक आहे.
भारतीय नौदलाचे सागरी वर्चस्व वाढत आहे. बदलती जागतिक समीकरणे, नव्याने येणाºया आव्हानांच्या अनुषंगाने भारतीय नौदलानेही आपले धोरण बदलले. पूर्वी हिंदी महासागरात वर्चस्व असलेले भारतीय नौदल आता त्या पलीकडच्या समुद्राची मुशाफिरी करत आहे. भारतीय सागरी सीमांचे रक्षण करतानाच जागतिक पातळीवरही सामरीकदृष्ट्या प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. भारतीत नौदल आता लांब पल्ल्याच्या कारवायांसाठी सज्ज होत असल्याचे लुथरा यांनी स्पष्ट केले.
कलवरीची प्रतीक्षा संपली
स्कॉर्पियन श्रेणीतील भारतीय बनावटीची पाणबुडी लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आधुनिक आणि कठोर सागरी चाचण्यांमुळे कलवरीच्या समावेशाला विलंब झाला आहे.
बदलत्या आव्हानांना सामारे जाण्यासाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या चाचणीतही नौदलाने बदल केल्याचे लुथरा यांनी सांगितले.
१४ डिसेंबर रोजी कलवरी औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.