दिल्लीसह 24 विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याची भीती, हाय अलर्ट जारी
By admin | Published: October 6, 2016 09:57 PM2016-10-06T21:57:53+5:302016-10-06T21:57:53+5:30
भारतीय गुप्तचर विभागानं दिल्लीसह चार राज्यांतील 24 विमानतळांना हाय अलर्ट जारी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतीय गुप्तचर विभागानं दिल्लीसह चार राज्यांतील 24 विमानतळांना हाय अलर्ट जारी केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकविरोधात दहशतवादी भारतात घुसून धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
दिल्लीसह जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील विमानतळ अथॉरिटीला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागानं या राज्यांतील पोलीस महासंचालकांना लेखी सूचना दिली आहे. विमानतळ अथॉरिटीनं पार्किंग लॉट आणि प्रवाशांच्या बॅगांची काळजीपूर्वक चौकशी करावी, असं पत्रकात नमूद केलं आहे.
येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. गुप्तचर विभागानं 100 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याचाही सूचनाही संरक्षण विभाग आणि केंद्र सरकारला दिली आहे.