एन्काऊंटरच्या भीतीनं गुन्हेगारांचा पोलीस ठाण्यातच मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 01:23 PM2018-04-05T13:23:43+5:302018-04-05T13:23:43+5:30
अनेक गुन्हेगार सध्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत.
अनेकदा गुन्हेगार फरार होतात. पोलिसांपासून दूर राहण्याचा, शक्य तितका लांब पळण्याचा प्रयत्न करतात, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पोलिसांच्या हाती लागलो, तर आपले काही खरे नाही, अशी भीती गुन्हेगारांमध्ये असते. मात्र उत्तर प्रदेशात सध्या याच्या नेमके उलट घडताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक गुन्हेगार सध्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, अनेक गुन्हेगार रात्रभर पोलीस ठाण्यातच मुक्काम करत आहेत. पोलीस ठाण्यात राहिलो, तरच सुरक्षित राहू, असा अनेक गुन्हेगारांचा समज आहे आणि यामागील मुख्य कारण आहे गुन्हेगारांनी घेतलेली एन्काऊंटरची धडकी.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात एन्काऊंटर केले जात आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगारांची भीतीने गाळण उडाली आहे. पोलिसांपासून दूर पळण्याचा प्रयत्न केल्यास एन्काऊंटर होणार, अशी भीती गुन्हेगारांना सतावत आहे. त्यापेक्षा पोलीस ठाण्यात गेलेले बरे, असा विचार अनेक गुन्हेगारांनी केला आहे. सीतापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मनोज कुमार नावाच्या गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला. त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सरपंचाची हत्या, लूटमार आणि खंडणी प्रकरणात मनोज कुमार पोलिसांना हवा होता.
मनोज कुमार प्रमाणेच जवळपास डझनभर गुन्हेगारांना सीतापूर पोलिसांनी यमसदनी धाडले आहे. याशिवाय पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सक्रीय असलेल्या गुन्हेगारांची यादीदेखील केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे अनेकजण पोलिसांना स्वत:हून शरण आले आहेत. तर काहीजण एन्काऊंटरच्या भीतीने थेट पोलीस स्टेशन गाठत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारे गुन्हेगार पोलीस ठाण्यांमध्ये दिसू लागले आहेत.