Jara hatke News: वाईट आत्म्यांच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी घेतले घरात कोंडून, मग पोहोचले पोलीस, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:23 PM2022-04-23T20:23:43+5:302022-04-23T20:24:12+5:30
Jara hatke : आंध्र प्रदेशमधील एका गावातील लोकांनी वाईट आत्म्यांच्या भीतीने स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये सरुबुज्जीली मंडल गावातील ही घटना आहे.
अमरावती (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशमधील एका गावातील लोकांनी वाईट आत्म्यांच्या भीतीने स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये सरुबुज्जीली मंडल गावातील ही घटना आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांची, समजूत काढली. तसेच भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून समजूत काढली.
श्रीकाकुलमच्या पोलीस अधीक्षक जीआर राधिका यांनी सांगितले की, आत्म्यांनी घेरलेले असल्याचा समज करून ग्रामस्थांनी १७ ते २५ एप्रिलदरम्यान बंद राहण्याचा आणि घराबाहेर न निघण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांनी दोन दिवस अनुष्ठान केले, त्यानंतर स्वत:ला गावामध्ये कोंडून घेतले. दरम्यान, पोलीस गावात दाखल झाल्यावर त्यांनी ग्रामस्थांनी स्वत:वर लादून घेतलेले लॉकडाऊन हटवले आहे.
एएनआयने श्रीनू या ग्रामस्थाच्या हवाल्याने सांगितले की, ग्रामस्थांनी स्वत:ला तिथे बंद करून घेतले होते जेणेकरून वाईट आत्म्यांपासून सुरक्षित राहता येईल. आमचे पूर्वज अनुष्ठान करत होते. गेल्या दोन दशकांपासून सारे काही व्यवस्थित होते. मात्र गेल्या तीन महिन्यात गावात पाच जणांचा अचानक मृत्यू झाला. त्यामध्ये गावच्या सरपंचांचाही समावेश होता. त्यामुळे ग्रामस्था एका जादुगारिणीकडे गेले. तिने गाव सुरक्षित नसल्याचे सांगितले. त्यानंतर लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले.
दरम्यान, अन्य एका ग्रामस्थाने सांगितले की, कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी गाव बंद करण्यात आला होता. तसेच तो वाईट आत्म्यांना पळवण्यासारखा प्रयत्न होता. तर काही ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांच्या गावामध्ये अमावस्येदिवशी अनुष्ठान करण्याची परंपरा आहे.