पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला देणार पॅलेस्टाइनला भेट, मोदी पॅलेस्टाइनला जाणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 08:05 AM2018-01-18T08:05:58+5:302018-01-18T08:39:33+5:30

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत.

On feb 10 modi will be 1st Indian PM Narendra Modi in Palestine | पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला देणार पॅलेस्टाइनला भेट, मोदी पॅलेस्टाइनला जाणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला देणार पॅलेस्टाइनला भेट, मोदी पॅलेस्टाइनला जाणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान 

Next

नवी दिल्ली - पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. सत्तेत आल्यापासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी अनेक कारणांनिमित्त वेगवेगळे परदेश दौरे केले आहेत. मोदी हे भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक परदेशांचे दौरे करणारे पंतप्रधान असल्याचंही म्हटले जात आहे.

सध्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजित दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइन देशाला भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाइनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त झाले आहे.  10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनला रवाना होणार आहेत. 

जॉर्डनमधील अम्मनवरुन पंतप्रधान पॅलेस्टाइनच्या रामल्ला येथे जातील. तेथे त्यांचे नियोजित कार्यक्रम होणार आहेत.  दरम्यान, पहिल्या तीन वर्षात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 27 देशांना भेट दिली तर मोदींनी पहिल्या 3 वर्षात तब्बल 49 देशांना भेट दिली आहे. वर्ष 2017 मध्ये  नरेंद्र मोदी यांनी 14 देशांना भेट दिली तर 2018 वर्षातील परदेश दौ-याची सुरुवात ते पॅलेस्टाइनपासून करणार आहेत.

दरम्यान, 4 जुलै 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. या तीन वर्षांच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याच्यावेळी पॅलेस्टाइनला भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याबाबत जगभरात आणि विशेषतः भारतीय राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या.

संयुक्त अरब अमिराती दौरा आणि पॅलेस्टाइन भेट एकत्र करण्याचे नियोजन साऊथ ब्लॉकतर्फे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसाठी उपस्थित राहाणार आहेत. या परिषदेचे यजमान संयुक्त अरब अमिराती असून 11 ते 13 फेब्रुवारी 2018 या तीन दिवसांमध्ये ती भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीची ही दुसरी भेट असेल. संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत आहेत. अबूधाबीचे राजपुत्र शेख झायेद बिन अल नाह्यान यांनीही भारताला दोन वेळा भेट दिली आहे. त्यामध्ये 26 जानेवारी 2016 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भारतदौऱ्याचाही समावेश आहे.

जेरुसलेमचा मुद्दा आणि पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूत
अमेरिकेने आणि विशेषतः डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या वर्षी डिसेंबर महिन्यात नव्या वादाला जन्म दिला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देऊन मध्यपुर्वेत नव्या अशांततेचे वादळ उठले. मात्र भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या बाजूने मतदान केले नाही. या मुद्यावर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतील. तर रावळपिंडीत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पॅलेस्टाइनचे राजदूत वालिद अबू अली कुख्यात दहशतवादी हाफिज सईद यांच्याबरोबर एकाच कार्यक्रमात सहभागी झाले होते. याबाबत भारत पॅलेस्टाइन सरकारकडे रितसर नाराजी व्यक्त करणार असून, पॅलेस्टाइनच्या भारतातील राजदुताकडेही याचा जाब विचारला जाणार आहे.

Web Title: On feb 10 modi will be 1st Indian PM Narendra Modi in Palestine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.