फेड एक्स्प्रेस सुस्साट...

By admin | Published: January 25, 2017 12:32 AM2017-01-25T00:32:55+5:302017-01-25T00:32:55+5:30

१७ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपला दर्जा सिद्ध करताना आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत

Fed Express Sussex ... | फेड एक्स्प्रेस सुस्साट...

फेड एक्स्प्रेस सुस्साट...

Next

मेलबर्न : १७ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपला दर्जा सिद्ध करताना आॅस्टे्रलियन ओपनच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. अव्वल मानांकित अँडी मरे आणि द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविच यांना नमवून स्पर्धेत ‘जायंट किलर’ ठरलेल्या जर्मनीच्या मिशा झ्वेरेवचा फेडररने सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्याचप्रमाणे महिला गटात अमेरिकेची दिग्गज खेळाडू व्हीनस विलियम्सनेदेखील उपांत्य फेरीत धडक मारली.
झ्वेरेव आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवणार का, याकडेच टेनिसप्रेमींचे लक्ष होते. परंतु, अनुभवी फेडररने आपल्या ‘क्लास’ खेळाच्या जोरावर झ्वेरेवला टेनिसचे धडे देताना ६-१, ७-५, ६-२ असे लोळवले. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये फेडररला झ्वेरेवने चांगली झुंज दिली. या वेळी झ्वेरेवने काहीसा आक्रमक पवित्रा घेत सर्विस करताना नेट्सजवळून वेगवान फटके मारत फेडररला जेरीस आणले. मात्र, फेडररने शांतपणे खेळ करताना मोक्याच्या वेळी बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेवने फेडररची सर्विसदेखील भेदली. परंतु, नंतर फेडररच्या अनुभवापुढे त्याचा निभाव लागला नाही. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने आपला अनुभव व दर्जा सिद्ध करताना झ्वेरेवच्या आव्हानातली हवाच काढली.
उपांत्य सामन्यात फेडररपुढे आपल्याच देशाच्या स्टॅन वावरिंकाचे तगडे आव्हान असेल. वावरिंकाने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाचे आव्हान ७-६, ६-४, ६-३ असे परतावले. दरम्यान, सामन्यानंतर वावरिंकाच्या आव्हानाविषयी मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली, की ‘वावरिंकाने उपांत्य फेरी गाठल्याचा मला आनंद आहे. परंतु, त्याने याच्यापुढे जाण्याची आवश्यकता नाही. हीच कामगिरी पुरेशी आहे.’ दुसरीकडे, वावरिंका म्हणाला, की ‘उपांत्य फेरीत मला रॉजरशी भिडायचे आहे. काही समर्थकांसाठी हा सामना कठीण असेल. परंतु, मला आशा आहे, की काही जण माझा उत्साह नक्कीच वाढवतील.’ दुसरीकडे महिला गटात अमेरिकेच्या दिग्गज व्हीनस विलियम्सने रशियाच्या अनास्तासिया पावलिचेनकोवाला नमवून उपांत्य फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
विशेष म्हणजे यासह ती गेल्या २३ वर्षांत कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी सर्वांत वयस्क खेळाडू ठरली. ३६ वर्षीय व्हीनसने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना अनास्तासियाचे आव्हान ६-४, ७-६ असे संपुष्टात आणले. उपांत्य सामन्यात व्हीनसपुढे आपल्याच देशाच्या कोको वँडेवेघेचे कडवे आव्हान असेल. वँडेवेघेने फ्रेंच ओपन विजेत्या गर्बाइन मुगुरुजाला ६-४, ६-० असा धक्का देत आगेकूच केली. शिवाय स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत वँडेवेघेने अव्वल खेळाडू एंजेलिक कर्बरला नमवून खळबळ माजवली होती. त्यामुळे व्हीनसपुढे कडवे आव्हान असेल.
‘बाबा, प्लीज अजून एक सामना जिंका’, फेडरर पुरवतोय मुलांचा हट्ट
फेडररने आॅस्टे्रलियन ओपनमध्ये विजयी धडाका लावला असला तरी याचे मुख्य कारण आपली मुलं असल्याचे त्याने स्पष्ट केले. चार मुलांचा वडिल असलेल्या फेडररने मुलांच्या हट्टासाठी अधिक सामने जिंकण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. मुळात १८वे ग्रँडस्लॅम पटकावण्यापेक्षाही मुलांना अधिकवेळ आॅस्टे्रलियामध्ये मजामस्ती करता यावी यासाठीच आपला अधिक प्रयत्न असल्याचे फेडररने म्हटले.
फेडररने म्हटले की. ‘पर्थमध्ये मुलांनी खूप एन्जॉय केले आणि मेलबर्नमध्ये त्याहून अधिक आनंद लुटत आहेत. मुलं खूप खेळत असून प्रत्येक दिवस बाहेर मजामस्ती करुन आनंदात घालवत आहेत. मुलांनी मला अनेकदा सांगितले आहे की, बाबा प्लीज तुम्ही हरु नका. आम्हाला अजून काही दिवस येथे मजा करायची आहे.’
तसेच, ‘पहिल्यांदाच माझ्या मुलीने मला सांगितले की, आता मला स्वित्झर्लंडमध्येही स्कीइंग करायला आवडेल. ‘आणखी एक सामना जिंका, म्हणजे आम्हाला अजून येथे मजा करता येईल,’ हा मुलांचा हट्ट पुरवण्यास मला आवडते,’ असेही फेडररने म्हटले.
सानिया, बोपन्ना एकमेकांविरुद्ध लढणार
सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय खेळाडूंनी मिश्र दुहेरीत आपआपल्या जोडीदारांसह विजयी कूच करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. विशेष म्हणजे दोन्ही भारतीय खेळाडू या फेरीत एकमेकांविरुद्ध लढतील. बोपन्नाने कॅनडाच्या गॅब्रिएला डेबरोवस्कीसह खेळताना युंग जान चॅन - लुकाज कुबोत या पाचव्या मानांकित जोडीचा ६-४, ५-७, १०-३ असा पराभव केला. दुसरीकडे, सानियाने झेक प्रजासत्ताकच्या इवान डोडिचसह खेळताना सेसेइ झेंग - अलेक्झांडर पेया यांचा २-६, ६-३, १०-६ असा पाडाव केला.

Web Title: Fed Express Sussex ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.