एमबीबीएससाठी शुल्क तब्बल दोन कोटी
By admin | Published: August 27, 2016 06:09 AM2016-08-27T06:09:26+5:302016-08-27T06:09:26+5:30
तामिळनाडूतील एखाद्या खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचा खर्च दुप्पट झाला असून, आता दोन कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
चेन्नई : तामिळनाडूतील एखाद्या खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेण्याचा खर्च दुप्पट झाला असून, आता दोन कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १७ आॅगस्ट रोजी नीटचे निकाल घोषित केल्यानंतर तामिळनाडूतील अभिमत विद्यापीठे आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी एमबीबीएसचे शुल्क वाढविले आहे.
या राज्यातील प्रमुख महाविद्यालयांत एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी सरासरी एक कोटी ८५ लाख रुपये एवढा खर्च येईल. शिकवणी शुल्कापोटी एक कोटी रुपये, तर कॅपिटेशन फी म्हणून ८५ लाख रुपये भरावे लागतील. विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देण्याचे सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांना बंधनकारक करण्यात आले आहे.
नव्या नियमानुसार, विद्यार्थी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या महाविद्यालयांकडे अर्ज करू शकतात. तथापि, प्रवेश हा निटमधील रँकच्या आधारेच होईल. ४० ते ८५ लाख रुपये कॅपिटेशन शुल्क भरावे लागेल, असे काही महाविद्यालयांनी पालकांना स्पष्ट सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
>शुल्क परवडत नसल्याची पालकांची तक्रार
‘प्रवेश हा गुणवत्तेवर आधारित असायला हवा, असा युक्तिवाद मी केला. तथापि, महाविद्यालय प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात हे निर्दिष्ट नसल्याचे सांगितले’, अशी तक्रार एका पालकाने केली. प्रवेशाच्या पारदर्शक यादीच्या अभावामुळे पालक महाविद्यालयांशी वाद करू शकत नाहीत. साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीचे शुल्क आपणास परवडू शकत नसल्याचे अनेक पालकांनी सांगितले.