धक्कादायक! मुलाला चोरल्याच्या संशयातून जमावानं महिलेचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 09:27 AM2018-06-27T09:27:06+5:302018-06-27T09:27:56+5:30
गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जवळपास 700 लोकांच्या जमावानं एका 45 वर्षीय भिकारी महिलेला मारहाण करून तिचा जीव घेतला आहे.
अहमदाबाद- गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जवळपास 700 लोकांच्या जमावानं एका 45 वर्षीय भिकारी महिलेला मारहाण करून तिचा जीव घेतला आहे. मारहाण केलेली महिला मुलांची चोरी करत असल्याचा जमावाला संशय होता. पोलिसांच्या माहितीनुसार, शांता देवी नावाची महिला इतर तीन सहकारी महिलांबरोबर भीक मागण्यास चालली होती.
त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये अशी अफवा पसरली की, ही महिला मुलांची चोरी करते. त्यानंतर पाच ते सहा जणांनी तिच्यावर हल्ला चढवला. पाहता पाहता तिथे 700 लोकांचा जमाव गोळा झाला. काही जणांनी त्या भिकारी महिलेची केसं ओढली आणि तिला काठीनं मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भिकारी महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुलांची चोरी करत असलेल्या अफवेनं अनेकांना मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे राग अनावर झालेल्या जमावाच्या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले जात आहेत. आसाम, कर्नाटक, छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये अशी प्रकरणं समोर आली आहेत.
मेसेजवरून पसरवली जातेय अफवा
गेल्या तीन-चार दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या क्लिपमध्ये जामनगर आणि द्वारकामध्ये 300 मुलांची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचं सांगितलं जातंय. अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजमुळेच जमाव निर्दोष लोकांवर हल्ले करत आहेत. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं आहे. अशा प्रकारची कोणतीही टोळी गुजरातमध्ये सक्रिय नाही. लोक सोशल मीडियातून अफवा पसरवत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला पोलिसांनी जनतेला दिला आहे.