गोव्यात लग्न, एकाच कंपनीत नोकरी अन् रिमोटवरुन वाद; लग्नाच्या सहा महिन्यांतच पत्नीने स्वतःला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:23 IST2025-03-05T09:23:20+5:302025-03-05T09:23:35+5:30
तेलंगणामध्ये एका २५ वर्षीय तरुणीने हुंड्यांच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

गोव्यात लग्न, एकाच कंपनीत नोकरी अन् रिमोटवरुन वाद; लग्नाच्या सहा महिन्यांतच पत्नीने स्वतःला संपवलं
Telangana Crime: गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वादातून आत्महत्यांचे प्रकार समोर येत आहे. कधी हुंड्यासाठी तर कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या घडत आहेत. हुंड्यासाठी आजच्या काळातही महिलांचा छळ होताना पाहायला मिळत आहे. अशातच तेलंगणामध्ये सहा महिन्यांपू्र्वी लग्न झालेल्या तरुणीने हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं आहे. अवघ्या २५ वर्षीय तरुणीने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरुणीच्या आईने जावयाविरोधात याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
तेलंगणाच्या हैदराबादमध्ये देविका नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली. २५ वर्षीय देविकाने २ मार्चच्या रात्री रायदुर्गम येथील प्रशांती हिल्स येथे राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत देविकाच्या आईने गुन्हा दाखल केला. जावई सतीश लग्नापासून देविकाला हुंड्यासाठी त्रास देत होता. याला कंटाळून देविकाने आत्महत्या केली, अशी माहिती तिच्या आईने दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
देविकाचे लग्न सहा महिन्यांपूर्वी गोव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सतीशसोबत झाले होते. देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत होते. दोघांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोव्यात लग्न केले. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये तणाव होता. याच तणावातून देविकाने आत्महत्या केली. या घटनेनंतर देविकाच्या कुटुंबीयांची अवस्था रडून रडून बिकट झालीय.
जावयाने माझ्या मुलीवर घर त्याच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकला. तसेच हुंड्यासाठी छळ केला, असं देविकाच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटलं. देविकाचा पती तिला हुंड्यासाठी त्रास देत असे. तिला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला होता. ते सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली, असं देविकाच्या कुटुंबियांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्चच्या रात्री सतिश आणि देविकामध्ये टीव्हीच्या रिमोटवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर सतिश घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तेव्हा त्याला देविका मृतावस्थेत आढळली. यानंतर देविकाने गळफास घेतल्याची माहिती त्याने पोलिसांना आणि कुटुंबीयांना दिली. दरम्यान, रायदुर्गम पोलिसांनी सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.