शहीदांच्या वंशजांचा सत्कार
By admin | Published: April 17, 2017 01:57 AM2017-04-17T01:57:11+5:302017-04-17T01:57:11+5:30
ब्रिटीश शासनाविरुद्ध १८१७ मध्ये सशस्त्र बंड करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील १६ सदस्यांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित केले
अंबिका प्रसाद , भुवनेश्वर कानुनगो
ब्रिटीश शासनाविरुद्ध १८१७ मध्ये सशस्त्र बंड करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील १६ सदस्यांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मानित केले. ओडिशातील आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राप्रती त्यांच्या योगदानाचे मोदी यांनी कौतुक केले. बक्की जगन्बंधू, लक्ष्मण नायक, चाकी खुंतिया आदींच्या कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील लिंगराज मंदिरात भेट दिली. ११ व्या शतकातील या मंदिरात त्यांनी फुले, फळे, दूध अर्पण करुन पूजाही केली. या मंदिराची पूर्ण माहिती घेत त्यांनी येथे एक फोटोही काढला. ब्रिटीशांविरुद्धच्या पाईका बंडातील शहीदांच्या वंशजांचा सत्कार मोदी यांनी केला. त्यानंतर ते सुरक्षा व्यवस्थेत लिंगराज मंदिरात दाखल झाले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मंदिर व्यवस्थापन समितीने त्यांचे जोरदार स्वागत केले.
मोदी यांनी मंदिरात महादेवाची पूजा केली. यावेळी मोदींनी मंदिर प्रदक्षिणा केली. २५ हजार वर्ग फूट क्षेत्रात वसलेले हे मंदिर ५४ मीटर उंच आहे. या परिसरात १५० लहानमोठे मंदिरे आहेत. भाजपच्या दोन दिवसीय बैठकीत भाग घेण्यासाठी मोदी येथे आलेले आहेत.
मोदींच्या रोड-शोमध्ये ११ किमीचा साडीफलक
दोन दिवसांच्या गुजरात भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी रात्री येथे अनोखा आणि भव्य असा रोड-शो आयोजित करण्यात आला. सूरत विमानतळ ते सर्किट हाऊस या ११ किमी लांबीच्या रस्त्यावर झालेल्या या रोड-शोने शहर दणाणून गेले.
या संपूर्ण ११ किमी अंतरात रस्त्याच्या एका बाजूला लावलेली फलकरूपी साडी हे प्रमुख आकर्षण होते. या साडीवर भाजपा सरकारची कामगिरी आणि कल्याणकारी योजनांची माहिती लिहिण्यात आली होती.
सूरतला विमान उतरण्यापूर्वीच मोदींनी टिष्ट्वट करून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचे आभार मानले आणि सूरत भेटीचा आनंद नमूद केला. मोदी यांच्या या भेटीसाठी संपूर्ण शहरभर रोषणाई केल्याचे दिसून येत होते. तसेच अनेक लोक रस्यावर होते.