'फरारी की सवारी' उद्योगपतीच्या जिवावर बेतली, ३ कोटींच्या कारचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 05:15 PM2018-06-04T17:15:17+5:302018-06-04T17:16:37+5:30
हावडा येथे भरधाव 3 कोटींची फरारी गाडी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून, अपघातात गाडीचालकाचा जागीच मृत्यू ओढावला.
कोलकाता- हावडा येथे भरधाव 3 कोटींची फरारी गाडी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून, अपघातात उद्योगपती गाडीचालकाचा जागीच मृत्यू ओढावला. कोलकाता शहरापासून 22 किलोमीटर अंतरावरच्या एनएच 6 महामार्गावर हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुभाजकाला गाडी धडकल्यानंतर गाडीचा चक्काचूर झाला.
43 वर्षीय उद्योगपती शिवाजी हे फरारी गाडी चालवत होते. त्यांच्या बाजूला त्याचा 17 वर्षांचा मुलगा श्रेयन बसला होता. तर मागच्या सीटवर मुलगी बसली होती. एनएच 6 या राष्ट्रीय महामार्गावर वीकेंड पिकनिकवरून परतत असताना हा अपघात झाला. साडेतीन कोटींची फरारी दुभाजकाला धडकल्यानं तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. सकाळच्या वेळेत रस्ता खाली असल्यानं शिवाजी यांनी गाडी 150 ते 200 किलोमीटरच्या स्पीडनं पळवली.
दोमजूर ब्रिजवर आल्यानंतर शिवाजी यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी दुभाजकाला जाऊन आदळली. त्यात बसलेल्या शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या मुलीला गंभीर दुखापत झाली. शिवाजी रॉय हे एम. एल. रॉय अँड कंपनी सॅनिटेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक होते. पोलिसांच्या माहितीनुसार, 43 वर्षांचे शिवाजी रॉय गाडी चालवत होते. त्यावेळी 21 वर्षांची आशना सुराना त्यांच्या मागेच बसली होती. तर 17 वर्षांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसला होता. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ बचावकार्य राबवत सुराना आणि त्यांचा मुलगा श्रेयन याला सुखरूप बाहेर काढलं. शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरानावर कोलकातातल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी सकाळी शिवाजी पिकनिकवरून परतत असताना मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी जात होते. त्यांचे मित्र दुस-या गाडीतून येथ होते. विशेष म्हणजे फरारीचा अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेले एअरबॅग्सही फुटले आहेत. तसेच पुढचा दरवाजा पूर्णतः तुटला आहे.