दिल्लीत मराठी संगीत व संगीत नाटकांचा महोत्सव
By admin | Published: November 3, 2016 06:20 AM2016-11-03T06:20:06+5:302016-11-03T06:20:06+5:30
दिल्लीत मराठी नाट्य संगीत व संगीत नाटकांचा महोत्सव रवींद्र भवनातील मेघदूत नाट्यगृहात,४ ते ६ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस संपन्न होणार आहे.
नवी दिल्ली : संगीत नाटक अकादमी व सार्वजनिक उत्सव समितीच्या विद्यमाने दिल्लीत मराठी नाट्य संगीत व संगीत नाटकांचा महोत्सव रवींद्र भवनातील मेघदूत नाट्यगृहात,४ ते ६ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस संपन्न होणार आहे. नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर लिखित स्वयंवर तसेच गोविंद बल्लाळ देवल लिखित संशयकल्लोळ नाटकांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी संशयकल्लोळचा प्रयोग रत्नागिरीची खल्वायन संस्था सादर करील. या नाटकाचे दिग्दर्शन मनोहर जोशींनी केले आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता कीर्ती शिलेदार दिग्दर्शित स्वयंवर नाटकाचा प्रयोग, पुण्यातील बालगंधर्व संगीत रसिक मंडळ सादर करणार आहेत. रविवारी दुपारी ४ वाजता संगीत नाटकांच्या वृत्तचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्रातर्फे माधवी वैद्य दिग्दर्शित मराठी नाट्य संगीताचा सोहळा संपन्न होईल. दिल्लीतल्या हिंदी भाषक रसिकांसाठी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे ‘मराठी नाट्यसंगीत का सौंदर्यबोध’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. मराठी संगीत नाटकांच्या महोत्सवाची मेजवानी दिल्लीकर रसिकांना अनेक वर्षानंतर अनुभवता येणार आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालय व दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. (विशेष प्रतिनिधी)