केरळमध्ये संघ, कम्युनिस्टांच्या कार्यालयांवर भीषण हल्ले
By admin | Published: March 4, 2017 04:35 AM2017-03-04T04:35:55+5:302017-03-04T04:35:55+5:30
केरळमध्ये एलाप्पुल्लीत (जि. पलक्कड) गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या हल्ल्यात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाचे (डीवायएफआय) तीन कार्यकर्ते जखमी झाले
नवी दिल्ली : केरळमध्ये एलाप्पुल्लीत (जि. पलक्कड) गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या हल्ल्यात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाचे (डीवायएफआय) तीन कार्यकर्ते जखमी झाले. रतीश (३०), युसुफ (३१) आणि सुधीश (२८) अशी जखमींची नावे आहेत. हल्लेखोर मोटारबाईक्सवर आले होते. डीवायएफआय ही मार्क्सवादी पक्षाची विद्यार्थी शाखा आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे म्हटले असले तरी त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.
कोळिकोड जिल्ह्यातील कल्लाची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर गुरुवारी झालेल्या हल्ल्याच्या काही तास आधी पलक्कड येथे हल्ला झाला. त्यात रा. स्वं. संघाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना कोळिकोडमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. हा हल्ला कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उज्जैन येथील नेते कुंदन चंद्रावत यांनी गुरुवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे शिर कापणाऱ्यास एक कोटी रुपये बक्षीस देईन, असे जाहीर केले होते. केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या मृत्युसाठी उज्जैनमधील संघाचे सह प्रचार प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी विजयन यांना जबाबदार धरले आहे. जो कोणी विजयन यांचा शिरच्छेद करून ते घेऊन येईल त्याला मी माझी मालमत्ता विकून एक कोटी रुपये बक्षीस देईन कारण विजयन हे संघाच्या कार्यकर्त्यांचे मारेकरी आहेत, असे चंद्रावत म्हणाले होते. पिनराई विजयन म्हणाले की.‘‘अशा वक्तव्यांमुळे मला त्रास होत नाही. वक्तव्याचा निषेध करून मी ती धमकी धुडकावून लावतो.’’
संघाने चंद्रावत यांच्या विधानापासून सुरक्षित अंतर राखले आहे. आमचा हिंसाचारावर कधीही विश्वास नसून आमचा लोकशाही मार्गांनी निषेधावर विश्वास आहे. कुंदन चंद्रावत यांनी भावनेच्या भरात केलेल्या विधानांचा आम्ही निषेध करतो, असे संघाने म्हटले.
>कुंदन चंद्रावत यांची संघातून हकालपट्टी
केरळचे मुख्यमंंत्री पिनाराई विजयन यांचे शिर कलम करणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य कुंदन चंद्रावत यांची शुक्रवारी संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.संघाचे मध्यप्रदेशचे प्रमुख प्रकाश शास्त्री यांनी ही कारवाई करत कुंदन चंद्रावत यांना संघाच्या सर्व पदांवरुन दूर केले आहे. चंद्रावत यांनी गुुरुवारी उज्जैैनमध्ये हे विधान केले होते. चंद्रावत हे संघाचे उज्जैनमधील सह प्रचार प्रमुख होते. केरळात माकपच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांची हत्या होत असून त्याचा बदला घेण्यासाठी चंद्रावत यांनी हे बक्षिस जाहीर केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आज संघाकडून ही कारवाई करण्यात आली.