फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
By admin | Published: October 8, 2016 05:03 AM2016-10-08T05:03:24+5:302016-10-08T05:03:24+5:30
सूर्योदयापासूनच त्यांची दिनचर्या सुरु होते. अगदी सामान्य व्यक्तींसारखे तेही कामासाठी सकाळीच बाहेर पडतात
भोपाळ : सूर्योदयापासूनच त्यांची दिनचर्या सुरु होते. अगदी सामान्य व्यक्तींसारखे तेही कामासाठी सकाळीच बाहेर पडतात आणि सायंकाळी घरी परतात. कुटुंबासह सुखाचे चार घास खाउन ते विश्रांती घेतात. अर्थात, हे मध्यप्रदेशच्या होशंगाबादमधील कैदी आहेत आणि हो, कैदी असूनही त्यांची ही दिनचर्या अशीच सुरु आहे.
साहजिकच, त्यांच्या मुक्त वावरण्यावर कुणालाही प्रश्न पडेल. पण, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे प्रयत्न सरकारकडून जाणीवपूर्वक सुरु आहेत. होशंगाबादच्या १७ एकरमधील या विस्तीर्ण खुल्या कारागृहात शंकर, इम्रान, मांगीलाल, धर्मेंद्र, जितेंद्र, हरिराम, महेश आदि कैदी कुटुंबासह राहतात. सायंकाळी दमून आल्यानंतर विरंगुळा म्हणून ते आवर्जुन टीव्ही पाहतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही दिनचर्या सुुरु होते. मध्यप्रदेश सरकारने खुल्या कारागृहाची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्यालाही आता पाच वर्षे उलटले आहेत. ३२ कोेटी रुपये खर्चून सरकारने खुल्या कारागृहाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. या ठिकाणी २५ कैदी एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यासाठी खास घरेही बनविण्यात आली आहेत. मध्यप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुशोभन बॅनर्जी यांनी सांगितले की, कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षेच्या शेवटच्या एक दोन वर्षांच्या काळात या खुल्या कारागृहात ठेवले जाते. अर्थात यासाठी नियमावली आहे. ती पूर्ण करणाऱ्या कैद्यांनाच येथे संधी दिली जाते. ज्यांची वर्तणूक चांगली आहे अशाच कैद्यांना खुल्या कारागृहात पाठविले जाते. दरम्यान, , होशंगाबादचा खुल्या कारागृहाचा प्रयोग यशस्वी झालेला आहे, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>उदरनिर्वाहासाठी भाजी विक्री
खुल्या कारागृहातील कैदी मुकेश केवटने सांगितले की, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. कोणी कँटीन चालवितो तर कोणी फळांची विक्री करतो. आम्ही कुटुंबासह राहतो आणि आमची मुले शाळेतही जातात. एकूणच काय तर या कैद्यांसाठी आता अंधाराचे जाळे संपले असून ते मोकळा श्वास घेउ लागले आहेत.