भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहणार, २०४७ पर्यंत बलशाली भारताची उभारणी: PM नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 06:14 AM2023-08-16T06:14:49+5:302023-08-16T06:15:45+5:30
१४० कोटी देशवासीयांना ‘माझे कुटुंबीय’ असे संबोधत आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सलग दहाव्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित देशाच्या निर्माणाचा वज्रनिर्धार व्यक्त केला. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून द्यायची असून त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन वाईट प्रवृत्तींमुळे देशाचा विकास खोळंबला होता, असा दावाही मोदी यांनी केला.
१४० कोटी देशवासीयांना ‘माझे कुटुंबीय’ असे संबोधत आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशवासीयांमध्ये एक मजबूत राष्ट्रनिर्मितीची पूरेपूर क्षमता असून केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण आणि लांगूलचालन हे या मार्गावरील मुख्य अडथळे होते. गेल्या ७५ वर्षांत काही विकृती समाजात निर्माण झाल्या असून त्यांचा समूळ नायनाट करणे हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
मणिपूरमध्ये शांततेचे पुनरागमन
गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने तेथील परिस्थिती आता पूर्ववत होत असून केवळ शांततेच्या माध्यमातूनच मणिपूरचा विकास साधता येईल, असे पंतप्रधान म्हणाले.
मोदीमंत्र...
- अमृतकाळ हा कर्तव्यकाळ आहे. म्हणजेच आज घेतलेल्या निर्णयाची फळे येत्या एक हजार वर्षांपर्यंत चाखता येतील.
- २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर त्यासाठी आजच निर्धार करून पुढील पाच वर्षे त्या दिशेने वाटचाल करावी.
- भारताची भौगोलिक स्थिती आणि वैविध्यातील एकता हे महत्त्वाचे दुवे असून त्यांची परस्परांत सांगड घालणे इष्ट ठरेल.
- राष्ट्र सर्वोपरि, ही वृत्ती बळावणे गरजेचे असून सरकारकडे कररूपातून जमा झालेला पै अन् पै देशवासीयांच्या कल्याणासाठी वापरला जाईल, याची दक्षता बाळगावी लागेल.
- जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश, घरांसाठी सुलभ कर्जे आणि २५ हजार जनऔषधी केंद्रांची उभारणी यांची हमी.
- महिला सक्षमीकरणावर भर देत दोन कोटी लखपती दीदी देशात निर्माण होतील, त्या दिशेने सरकार प्रयत्न करणार.
देशवासीयांचे मानले आभार
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासीयांचे आभार मानले. देशापुढील समस्यांचे मूळ देशवासीयांनी शोधले आणि ३० वर्षांनंतर प्रथमच २०१४ मध्ये देशाला एक मजबूत आणि स्थिर सरकार मिळाले. सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करत २०१९ मध्ये पुन्हा निवडून दिले. त्यासाठी देशवासीयांचा आभारी असल्याचे स्पष्ट करत मोदींनी आता पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची संधी देशवासीय देतील, अशी खात्री व्यक्त केली.
स्वप्ने अनेक आहेत. संकल्प आणि धोरणे स्पष्ट आहेत. आमच्या मनोवृत्तीसमोर प्रश्नचिन्हांची माळ नाही. मात्र, असे असले तरी आपल्याला काही कटु वस्तुस्थितींचा स्वीकार करत वाईट प्रवृत्तींवर मात करावी लागेल. २०४७ मध्ये जेव्हा देश १०० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करत असेल तेव्हा एक मजबूत आणि विकसित राष्ट्र म्हणून भारताची जगात ओळख निर्माण झाली असेल. त्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार करूया. त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करू या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान