मरगळ झटका आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा - नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:11 AM2017-10-19T04:11:52+5:302017-10-19T04:12:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागातील संचालक आणि उपसचिवांशी संवाद साधून नोकरशाही २०२२ पर्यंत देशनिर्माणासाठी आणि समाजाच्या बदलत्या गरजांविषयी संवदेनशील राहताना मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन केले.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागातील संचालक आणि उपसचिवांशी संवाद साधून नोकरशाही २०२२ पर्यंत देशनिर्माणासाठी आणि समाजाच्या बदलत्या गरजांविषयी संवदेनशील राहताना मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन केले. केंद्रातील सचिव, अतिरिक्त सचिव व सहसचिवांशी पंतप्रधान नियमित संवाद साधत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी केली मधल्या फळीतील अधिका-यांशी चर्चा
मोदी यांनी निर्णयप्रक्रियेतील मधल्या फळीतील नोकरशहांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी विविध विषयांवर गटनिहाय दोन तास चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी चार गटांत ३८० संचालक आणि उपसचिवांशी संवाद साधला.
प्रशासन, भ्रष्टाचार, सार्वजनिक उपक्रम, ई-मार्केट प्लेस, आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास, कृषी, परिवहन, राष्टÑीय एकात्मता, जलसंसाधन, स्वच्छ भारत, संस्कृती, दळण-वळण आणि पर्यटन या विषयावर तयारीनिशी येण्यास सांगण्यात आले होते. प्रत्येक गटातील अधिकारी चर्चेसाठी आणि पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी तयारीने आले होते.
चार गटांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह, वरिष्ठ अधिकारी आणि सचिवालयातील सचिव उपस्थित होते. शासन प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी यावेळी अधिकाºयांना या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी नावीन्यपूर्व मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.