पाण्यासाठी दोन गावातल्या गावकऱ्यांमध्ये हाणामारी, आठ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 10:45 AM2019-06-07T10:45:52+5:302019-06-07T10:45:52+5:30
राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे.
जयपूरः राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. या पाण्याच्या समस्येनंही गुरुवारी हिंसक स्वरूप धारण केलं आहे. अलवार जिल्ह्यात पाण्यासाठी दोन गावांमध्ये हिंसाचार झाला आहे. ज्यात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. लागोपाठ सात दिवस या गरमी लोकांची हालत बेकार झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, ही लढाई अलवार जिल्ह्यातील किशनगडबास भागातल्या कोलगाव आणि घासोली गावकऱ्यांमध्ये झाली आहे. इथे घासोलीतल्या जलसिंह यांचं शेत कोलगावात आहे. ते आपल्या शेतात बोरिंगनं पाणी घासोलीत आणण्यासाठी पाइपलाइन टाकत होते.
ज्याची माहिती कोलगावातल्या लोकांना मिळाली. कोलगावच्या गावकऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर दोन्ही गावांमध्ये हिंसाचार भडकला. कोलगावकऱ्यांच्या मते, जिथे शेत आहे तिकडे शेती करा, पण हे पाणी आम्ही घासोलीमध्ये जाऊ देणार नाही. बुंदीमध्ये भीषण गरमीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील तापमान 2 डिग्रीने कमी होऊन 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. राजस्थानमधील बार्मर आणि जैसलमेर या शहरांमध्ये तीव्र उष्णतेमुळे सामान्यांचे जीवन असह्य झाले होते. तसेच उष्णतेच्या लाटेमुळे बीएसएफ जवानांना सीमेवर संरक्षण करताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
बार्मर येथील मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश चौधरी यांनी सांगितले की, उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काजळी घेणे गरजेचे आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच उन्हात प्रवास करणे टाळावे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.