चीनच्या सीमेजवळ लढाऊ विमाने होणार तैनात; न्योमा एअरफिल्ड होणार अपग्रेड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 08:56 AM2022-10-28T08:56:44+5:302022-10-28T08:58:04+5:30
नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारतानेही प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सीमेजवळच्या एअरफिल्ड्स अपग्रेड करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ असलेल्या न्योमा अॅडव्हान्स लैंडिंग ग्राउंड (एएलजी) अपग्रेड करण्याच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे काम पूर्ण झाल्यानंतर चीनच्या कोणत्याही हालचालींना तातडीने प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे. नवी एअरफिल्ड आणि लष्करी सुविधांच्या निर्मितीचे काम सीमा रस्ते संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.
न्योमा एअरफिल्डचे महत्त्व
गलवान संघर्षानंतर वाढलेल्या तणावादरम्यान सैनिक आणि इतर लष्करी साहित्य सीमेजवळ लवकर नेण्यासाठी न्योमा एअरफिल्डचा वापर करण्यात आला होता. येथे चिनूक हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स आणि सी- १३०जे ही विमानेदेखील उतरविण्यात आली होती. चीनच्या सीमेपासून ही एअरफिल्ड केवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे.
हवाई दलाची क्षमता वाढणार
- सरकारकडून एअरफिल्डच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. आता तातडीने लढाऊ विमानांच्या तैनातीसाठी अपग्रेड करण्याचे काम सुरु होणार आहे.
- लढाऊ विमानांचे संचलन येथून सुरु झाल्यास हवाई दलाचे सामर्थ्यात वाढणार आहे. शत्रूने कोणतेही वाकडे पाऊल टाकल्यास तत्काळ प्रत्युत्तर देता येईल.
भारत-अमेरिकेचा चीनलगत युद्धसराव
भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला लागून असलेल्या सीमाभागात भारत व अमेरिकेचे लष्कर संयुक्त युद्धसराव करणार आहे. दोन्ही देशांचे लष्कर १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उत्तराखंडमधील औली भागात हा युद्धसराव करणार आहे. हा प्रदेश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून १०० किमी दूर अंतरावर आहे. एकूण सातशे सैनिक त्यात सहभागी होतील.