झुंजार! दोन गोळ्या लागल्या, गंभीर जखमा झाल्या, पण दहशतवाद्यांना सोडलं नाही, भारतीय लष्कराच्या श्वानाच्या शौर्याला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 01:14 PM2022-10-12T13:14:12+5:302022-10-12T13:14:49+5:30
Indian Army News: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक फायटर श्वान जखमी झाला. त्याचं नाव झूम असं आहे. मात्र दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक फायटर श्वान जखमी झाला. त्याचं नाव झूम असं आहे. मात्र दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला. या श्वानाच्या शौर्याची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉप्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. या कुत्र्यावर सध्या श्रीनगरमधील लष्कराच्या वेटनरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या श्वानावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता झूमची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या तुटलेल्या पायावर प्लॅस्टर करण्यात आले असून, त्याच्या चेहऱ्यावरील जखमांवर उपचार करण्यात आले आहेत. पुढच्या २४ ते ४८ तासांसाठी त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
भारतीय लष्कराने या श्वानचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. झुम नावाच्या या श्वानाला दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये झूमबाबत सांगण्यात आले की, तो खूप प्रशिक्षित, निडर आणि कटीबद्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. झूम लष्कराच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी होत असतो. या व्हिडीओमध्ये ज्या मोहिमेदरम्यान, झूम जखमी झाला त्याची माहितीही देण्यात आली आहे.
We wish Army assault dog 'Zoom' a speedy recovery. #Kashmir@adgpi@NorthernComd_IApic.twitter.com/i1zJl0C2Gw
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) October 10, 2022
१० ऑक्टोबर रोजी सकाळी अनंतनागमधील कोकरनाग येथे एका मोहीम सुरू झाली. त्यावेळी झूमकडे दहशतवादी जिथे लपले होते ते घर खाली करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. झूमने दहशतवाद्यांना ओळखले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी झूमला दोन गोळ्या लागल्या. मात्र गंभीर जखमा झाल्या असतानाही त्याने आपलं काम सुरू ठेवलं. त्यामुळे लष्कराला या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं.