राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:42 AM2024-12-02T07:42:52+5:302024-12-02T07:43:10+5:30
वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर
वायनाड : आमची लढाई राष्ट्रीय भावनेसाठी आणि भारताचा आत्मा जपण्यासाठी आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी येथे विविध जाहीर सभांतून बोलताना सांगितले.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर प्रियांका दोन दिवसांच्या वायनाड दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी जाहीर सभा घेतल्या. इंडिया आघाडी आणि काँग्रेस लोकशाही संस्थांना सत्ताधाऱ्यांच्या धोरणांपासून वाचवण्यासाठी लढत असल्याचे त्या म्हणाल्या. वायनाड भूस्खलनातील पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने आपण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवणार असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीयदृष्ट्या विचार न करता भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या सभांमधून केले.
पर्यटनाला चालना देण्याची गरज
nवायनाडमध्ये भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकतेच अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेकांना हा भाग असुरक्षित वाटू लागला आहे; परंतु हे नैसर्गिक संकट फार मर्यादित भौगोलिक भागापुरते होते.
nआता येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित करून हा प्रदेश अत्यंत सुंदर आणि सुरक्षित आहे याची जाणीव पर्यटकांना होईल असे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रियांका यांनी नमूद केले.