मोदींवर गुन्हा दाखल करा; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 04:25 PM2018-04-11T16:25:57+5:302018-04-11T16:25:57+5:30

यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. 

File a charge against Modi; Demand for the victim's daughter | मोदींवर गुन्हा दाखल करा; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची मागणी

मोदींवर गुन्हा दाखल करा; आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची मागणी

Next

यवतमाळ :  बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही मिळाला नाही, त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून काल यवतमाळ येथील एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनं केलेल्या आत्महत्येप्रकरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत शेतकरी शंकर चायरे यांची मुलगी जयश्रीनं ही तक्रार दाखल केली आहे. तसेच मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. 

‘माझ्या आत्महत्येची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर राहील,’ अशी चिठ्ठी लिहून या शेतक-याने प्राण त्यागला. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे मंगळवारी ही घटना घडली. शंकर चायरे (५०) असे त्यांचे नाव आहे. चायरे यांच्याकडे सहा एकर शेती असून, यंदा कापसाची पेरणी केली होती. तीन-चार वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने कर्ज वाढले होते. त्यातच कापसावर बोंडअळीने प्रचंड हल्ला चढविला. त्यामुळे ३० टक्केही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे ही चिंता त्यांना सतावत होती, असे त्यांची मुलगी जयश्रीने सांगितले.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चायरेंनी मोदी जबाबदार असल्याचं नमूद केलं होतं. आता या प्रकरणावरून काँग्रेसनं भाजापवर निशाणा साधला आहे. सामान्य माणसानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारवर पोलीस गुन्हा दाखल करतात. तर मग हे प्रकरण वेगळं कसं असू शकतं, असा प्रश्न माजी खासदार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पटोले यांनी केली आहे. 

Web Title: File a charge against Modi; Demand for the victim's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.