फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:04 IST2025-02-08T17:04:11+5:302025-02-08T17:04:29+5:30
गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत.

फाईल बाहेर जाऊ नयेत...! दिल्ली सचिवालय सील; आपचा पराभव निश्चित होताच उपराज्यपालांचे निर्देश
गेल्या दीड वर्षांपासून आपला भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून चोहोबाजुंनी घेरल्यानंतर भाजपाने अखेर दिल्लीवर २७ वर्षांनी भगवा झेंडा फडकविला आहे. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. यामुळे आप कोणालाच जुमानत नव्हती. या काळात कोणते कोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाईल बाहेर जाऊ नयेत म्हणून उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत.
आप हरल्याचे स्पष्ट होताच उपराज्यपालांनी सचिवालय सील करण्याचे आदेश देत दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण केले आहे. व्ही के सक्सेना यांच्या निर्देशानंतर दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाने याचा आदेश काढला आहे.
भाजपाच्या ३० जागा जिंकल्याचे समजताच सक्सेना यांनी या हाचलाची केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या आदेशात सचिवालयातील कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विभागाच्या परवानगीशिवाय कोणतीही फाइल, कागदपत्रे, संगणक हार्डवेअर इत्यादी दिल्ली सचिवालयाच्या बाहेर नेले जाऊ शकत नाही. तसेच, सर्व विभाग, एजन्सी आणि मंत्री परिषदेच्या कॅम्प ऑफिसना विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही रेकॉर्ड किंवा फाइल्स हटवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
केजरीवालांकडून भाजपाला शुभेच्छा...
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मी भाजपाला विजयाच्या शुभेच्छा देतो. मी अशी अपेक्षा करतो की दिल्लीच्या जनतेने भाजपाला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत, ती विधायक कामे भविष्यात भाजपाकडून नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधीपक्षाची भूमिकाही चोख पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार, अशा भावना केजरीवाल यांनी व्यक्त केल्या