अश्लील वक्तव्याप्रकरणी कुमार विश्वास यांच्याविरोधात तक्रार दाखल
By admin | Published: January 31, 2015 04:28 PM2015-01-31T16:28:14+5:302015-01-31T17:59:13+5:30
अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - दिल्ली विधानसभा निवडणूकीला अवघा आठवडा उरलेला असताना भाजपा आणि आपमध्ये चांगलचे युद्ध पेटले आहे. अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर भाजपाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विश्वास यांनी ठणकावून सांगितले आहे.
प्रचारसभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत विश्वास यांनी एक अश्लील टिप्पणी केली, असा आरोप बेदींनी केला असून याप्रकरणी भाजपाने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. ' असे अनैतिक, विषारी आणि विकृत विचार करणा-यांना समाजापासून दूर करण्याची गरज आहे, असे ट्विट बेदींनी केले आहे. ज्या पक्षाच्या नेत्याचे विचार महिलाविरोधी असतील आणि ज्याची विकृत मानसिकता असेलस अशा व्यक्तीकडून महिला सुरक्षा आणि सन्मानाची अपेक्षा कशी करणार असा सवालही बेदींनी विचारला आहे.
कुमार विश्वास यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. बेदी जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी माझे वक्तव्य लक्ष देऊन ऐकावे, आपले वक्तव्य बेदी यांना उद्देशून नव्हे तर भाजपाला उद्देशून असल्याचे स्पष्टीकरण विश्वास यांनी दिले.
काय आहे वक्तव्य?
कुमार विश्वास यांच्या ज्या वक्तव्यावरून एवढा वाद निर्माण झाला आहे , ते वक्तव्य नेमके आहे तरी काय?
एका रॅलीदरम्यान कुमार विश्वास यांनी भाजपावर हल्ला चढवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ब-याच काळापासून बीजेपी अरविंद केजरीवाल यांच्यातील उणिवा शोधण्याचे काम करत आहे. त्यांना दोन उणिवा मिळाल्या. पहिली उणीव म्हणजे, केजरीवाल हे मफलर घालतात. पण केजरीवाल यांनी मफलर चोरला आहे का असा सवाल विचारताना विश्वास दिसत आहेत आणि केजरीवाल यांच्यातील दुसरी उणीव म्हणजे ते खूप खोकतात. तुम्हाला त्याचा काय त्रास झाला, तुम्ही काय त्यांच्यासोबत त्यांच्या बेडरूममध्ये झोपता का? असा सवाल विश्वास यांनी भाजपाला विचारला.