पुनर्विचार याचिका दाखल करणे योग्य ठरणार नाही - सुन्नी वक्फ बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 05:06 PM2019-11-09T17:06:25+5:302019-11-09T17:07:49+5:30
सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
लखनऊ : तब्बल सात दशके आणि 40 दिवस चाललेला अयोध्या-बाबरी मशीद विवाद आज संपला. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी असा निकाल दिला. यावर पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या निकालावर कोणतीही फेरविचार याचिका किंवा आव्हान याचिका दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारुकी यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आमचा या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा कोणताही विचार नाही.
तसेच फारुकी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने मशीदीसाठी 5 एकर जागा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर वक्फ बोर्डाच्या सदस्याशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही आधीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य असल्याचे म्हटले होते. यामुळे कोणतीही फेरविचार याचिका दाखल करणे उचित नाही. चुकीचे ठरेल.
तर शिया मौलाना यांनीही निकालाचे स्वागत केले आहे. मुस्लिमांनी आणि मोठ्या लोकांनी या निकालाला स्वीकारले आहे. यामुळे हा वाद संपला आहे. निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला आहे. पण मला वाटते की हा वाद इथेच थांबायला हवा.