निर्भया प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सुनावणार अंतिम निकाल
By admin | Published: May 5, 2017 07:58 AM2017-05-05T07:58:27+5:302017-05-05T08:04:02+5:30
देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारही आरोपींच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. आपल्याला न्याय मिळेल अशी आशा निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय 27 मार्च रोजी राखून ठेवला होता जो आज सुनावला जाणार आहे. आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
अल्पवयीन दोषीसह सह जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता आणि त्यानंतर तिची अमानुष हत्या केली होती. यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायलयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली.
निर्भयाच्या वडिलांनी आपल्या न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याची आशा व्यक्त केली आहे. फक्त आपल्यालाच नाही तर संपुर्ण समाजाला न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. निर्भयावर जो अत्याचार झाला तो फक्त एका तरुणीवर नाही तर समाजाविरोधात केलेला गुन्हा होता असंही ते बोलले आहेत. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली.
कनिष्ठ न्यायालयाने 13 सप्टेंबर 2013 रोजी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांची शिक्षा नक्की करण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे रेफर करण्यात आलं. साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. चौघांना हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही न्यायालयाने विशेष नमूद केलं होतं.
कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवलं होतं. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा खेत्रपाल आणि प्रतिभा राणी यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर 3 जानेवारी 2014 रोजी निर्णय राखून ठेवला होता. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं.
सर्वोच्च न्यायालयात धाव -
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपी मुकेश पवन आणि त्याचा वकिल एमएल शर्मा यांनी 15 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर इतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी करत फाशीवर स्थगिती आणली आहे.
सहा आरोपींपैकी एक राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर सहावा आरोपी अल्पवयीने असल्याने त्याला तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.